Pune Political News : गेल्या दीड वर्षापासून मनसेकडून पुणे लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. आता मात्र अचानकच या यादीत भर पडत गेली. पाच वर्षांपूर्वी मनसे पुण्यात दुसऱ्या क्रमांकावर होती. आता मात्र मनसे निवडणूक लढवू शकत नाही, अशी चुकीची माहिती राज ठाकरेंना देण्यात आली. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांसमवेत काम करण्याची इच्छा नाही. मी मनसेकडे परतीचे दोर कापलेले आहेत. राज ठाकरेंनी बोलावले तरी मी परतणार नाही, असे वसंत मोरेंनी ठासून सांगितले.
मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी (Vasant More) पत्रकार परिषदेत शहर पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता सडकून टीका केली. ते म्हणाले, राज यांच्यासमवेत 25 वर्षांपासून काम करत आहे. राज ठाकरेंच्या हृदयात माझे स्थान होते. मात्र, माझ्याबद्दल राज ठाकरेंकडे चुकीच्या गोष्टी पोहोचवून माझ्या स्थानाला, विश्वासाला धक्का देण्याचे काम अनेकांनी केले. आता पक्षाने लोकसभेची निवडणूक लढवायला नको, अशी नकारात्मक भूमिका पदाधिकारी घेत आहेत. त्यामुळे तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांवर परिणाम होईल. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांसोबत काम करण्याची अजितबातच इच्छा नाही, असे म्हणत मोरेंनी मनसेत परतणार नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानुसार पुण्यातून मनसेचा अहवाल पाठवला गेला. त्यात पुण्यातून कुणीही लोकसभा निवडणूक लढवू शकत नाही, अशी चुकीची माहिती दिली. आता माझ्यावर कुरघोडी करण्यासाठीच नकारात्मक रिपोर्ट दिला जात आहे. याबाबत मी वारंवार स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठांनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या लोकांकडून पदे काढून त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता अशा लोकांसमवेत काम करण्याची इच्छाच राहिलेली नाही.
राज्यासह पुण्यातही मनसेची (MNS) ताकद होती. पुण्याचा मनसेचा पहिला खासदार होऊ शकतो, असे विश्वासाने म्हणत होतो. पुणे लोकसभेसंदर्भात राज ठाकरेंची वेळही मागितली होती, मात्र त्यांनी वेळ दिली नाही. मग निवडणूक लढवणे हा माझा गुन्हा आहे का? पक्ष संघटना मोठी करण्याचा माझा प्रयत्न चुकीचा ठरवणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित करत मोरेंनी शहर पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही मोरेंनी या वेळी स्पष्ट केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.