वेल्हे (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (pdcc bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाच्या माध्यमातून महिला गटातून वेल्हे तालुक्यातील निर्मला कृष्णा जागडे यांना प्रथमच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या निवडून आल्यास तब्बल २५ वर्षांनंतर वेल्ह्यातील दोन व्यक्तींना जिल्हा बॅंकेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वेल्हे राष्ट्रवादीला बळ देणारा ठरणार आहे. (Velha will get two directors of District Bank after 25 years)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अ वर्ग गटातून वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रेवणनाथ दारवटकर यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. ते सलग सातव्यांदा जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविणार आहेत. निर्मला कृष्णा जागडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा बँकेवर महिला संचालक म्हणून काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. जागडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २००७ मध्ये वेल्हे पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडणूक आल्या होत्या, तर २००९ ते २०१२ या कालावधीत त्यांनी वेल्हे पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिला गटातून वेल्हे तालुक्यास प्रथमतःच अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. सुमारे २५ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर वेल्हे तालुक्यातील महिला संचालकपदी काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. या पूर्वी १९९६ मध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व राजगड सहकारी कारखान्याच्या विद्यमान संचालिका शोभाताई जाधव यांनी जिल्हा बँकेचे चार वर्षे उपाध्यक्षपद भूषविले होते. याच कार्यकाळात रेवणनाथ दारवटकरसुद्धा जिल्हा बॅंकेचे संचालक होते.
राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. राष्ट्रवादी पक्षाने मला भरभरून दिले आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे मला बॅंकेच्या उमेदवारीच्या रुपाने बक्षीस मिळाले आहे, अशी भावना निर्मला जागडे यांनी ‘सरकारनामा’ शी बोलताना व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.