पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने एका बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार पुण्यात घडल्याने त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. खुद्द अजितदादाही चकीत झाले. त्यांनीच या प्रकरणात पुणे पोलिसांना (Pune Police) तपास करण्याच्या सूचना दिल्या आणि पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. हा सारा प्रकार कसा घडला हे अजित पवार यांनीच आज पुण्यात पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की अतुल लुंकड या बिल्डरला खंडणीखोरांनी फोन केला होता. त्याचा आणि माझा परिचय आहे. मी कोणाला फोन केल्यानंतर माझा नंबर कोणाला कळत नाही. ज्याला फोन केला आहे त्याच्या फोनवर माझा नंबर न दिसता private number असे लिहिलेले येते. खंडणीखोरांनी साॅफ्टवेअरचा वापर करून लुंकड यांना फोन केला होता. त्यावेळी लुंकड यांच्या फोनवर अजित पवार, अशी अक्षरे दिसली. माझा फोन आल्यानंतर असे दिसत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्याला संशय आला आणि त्यांनी तातडीने मला फोन केला. त्या वेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माझ्यासोबतच होते. त्या वेळी मी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन करून संबधितांवर कारवाईचा आदेश दिला.
प्रायव्हेट नंबर कोणाला मिळतो?
राज्याच्या गृहखात्याने यासंबंधी आदेश दिला तरच आपला नंबर इतरांना न कळण्याची सुविधा मोबाईल कंपन्या देतात. अनेक व्हीआयपी नेते या सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे या व्हीआयपी व्यक्तीने फोन केला तरी private number अशी अक्षरे येतात. त्यामुळे नंबर समजू शकत नाही आणि अर्थातच तो सेव्हही करता येत नाही.
`मी राष्ट्रीय राजकारणावर बोलत नाही..`
अजित पवार हे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अगदी सविस्तरपणे देतात. कधीकधी ते पाल्हाळिकपण होते पण ती त्यांची पद्धत आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काॅंग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत युतीत फक्त एक जागा मिळाली आहे आणि गोव्यातही या पक्षाची शिवसेनेशी युती ही नोटापेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली होती.
त्यावर अजित पवार यांना विचारले असता ते थेट त्यांच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत गेले. ते म्हणाले की मी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेलो होतो. शरद पवार हे संरक्षणमंत्री झाल्यानंतर लगेच सहा महिन्यांत मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. मी खासदार होतो तेव्हाही राष्ट्रीय राजकारणावर बोलत नव्हतो. तुम्ही मला महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीह विचारा मी त्याला बेधडकपणे उत्तरे देतो. पवार साहेब, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे हे राष्ट्रीय राजकारणावर बोलतात. तुम्ही त्यांना विचारा. पण पवार साहेबांविषयी बोलताना समोरच्यांनी विचार करायला पाहिजे. पवार साहेबांची राजकीय उंची आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणात मिळणारा आदर याचा विचार करून बोलावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.