Pune News : पन्नालाल सुराणांना बदलण्याचा सल्ला देणारा अधिकारी कोण ? मुख्यमंत्री दखल घेणार का ?

गेल्या चार महिन्यांपासून महिला व बालविकास विभागात ९२ वर्षीय सुराणा आणि त्यांच्या सहकारी अनुदानासाठी सातत्याने हेलपाटे घालत आहेत.
Paannalal Surana
Paannalal Surana
Published on
Updated on

Pune News : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पन्नालाला सुराणा यांच्या `आपलं घर’ या अनाथालयाला अनुदान मिळण्यासाठी महिला बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी टेबलाखालून पैसे मागितल्याची माहिती समोर आली आहे. पण सुराणा यांनी टेबलाखालून पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आता काळ बदलला आहे, तुम्हीही बदला, असा सल्लाही दिला आहे. या सर्व प्रकारामुळे अधिकाऱ्यांमधील लाचखोरीचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकाराची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर १९९३ रोजी लातूर- उस्मानाबादमध्ये भूकंप झाला. यात हजारो लोकांनी आपले जीव गमावले, अनेक मुले अनाथ झाली. अशा अनाथ मुलांसाठी सुराणा यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये राष्ट्रसेवा दल संचलित ‘आपलं घर’ हे बालगृह सुरू केले. पहिल्या वर्षी त्यांच्याकडे २५०-३०० मुले होती. सुराणा यांचे काम पाहून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या संस्थेला पाच एकर जागा दिली. सध्या या संस्थेत पहिली ते दहावीतील सुमारे १२५ हून अधिक मुले वास्तव्यास आहेत. त्यानंतर २००० सालापासून या संस्थेला शासकीय अनुदान मिळू लागले. पण २०१३- १४, १४-१५ या वर्षांचे २५ लाख १२ हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही. त्यासाठी सुराणा यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०२० मध्ये न्यायालयाने महिला व बालविकास आयुक्तालयाला हे प्रकरण लवकर मार्गी लावण्याचा आदेश दिला.

Paannalal Surana
Gujrat Politics : आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना गुजरात पोलिसांकडून अटक

त्यानंतर रखडलेले अनुदान मिळवण्यासाठी चार महिन्यांपूर्वी सुराणा आणि त्यांचे सहकारी पुण्यात आले होते. महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी संस्थेला लवकरच अनुदान देण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यानंतर ‘एका किराणा बिलात घोळ झाला आहे’, ‘ट्रस्टचे आधार कार्ड नाही’, अशा एक ना अनेक त्रुटी काढत अनुदान देण्यास अधिकाऱ्यांनी टाळटाळ सुरु केली. यावर सुराणा यांनी ट्रस्टचे पॅन कार्ड असते, असं स्पष्ट केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आधार कार्डबाबत त्यांचे म्हणणे कायम ठेवले.

त्यानंतर, सुराणा यांच्या सहकाऱ्यांनी महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. यावेळीही अधिकाऱ्यांनी थेट ‘आम्ही पदरमोड करून काम करतो, त्याकडे बघा’ ‘काही जमत असेल तर करा’ असेच सांगितले. त्यावर सुराणा यांच्या सहकाऱ्यांनी ‘आम्ही संस्था १९९३ मध्ये सुरू केली. तेव्हापासून एकदाही टेबलाखालून पैसे दिले नसल्याचे सांगितले. त्यावर संबंधित त्या अधिकाऱ्यांनी ‘आता काळ बदलला आहे. तुम्हाला काही तरी करावेच लागेल’ असे उत्तर दिले. गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकरणावर सुराणा आणि त्यांचे सहकारी आता निराश झाले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनीही प्रयत्न केले परंतु, त्यांनाही त्या अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे लोकसहभागातून ‘भोजन निधी’ उभारून त्याद्वारे मुलांचे संगोपन करण्याची वेळ ‘आपलं घर’ या संस्थेवर आली आहे.

अनुदानासाठी गेल्या चार महिन्यांपासून महिला व बालविकास विभागात ९२ वर्षीय सुराणा आणि त्यांच्या सहकारी सातत्याने हेलपाटे घालत आहेत. परंतु, अधिकाऱ्यांना ‘ टेबलाखालून हवे असलेले’ काही मिळत नाही. अनुदान मिळत नसल्याने संस्थेची अनेक कामेही रखडली आहेत. त्यामुळे सुराणा आणि त्यांचे सहकारीही आता हतबल झाले आहेत. याबाबत सुराणा यांनी विधीमंडळाच्या अंदाज समिती आणि मुख्य सचिवांनाही पत्र लिहिले आहे. परंतु, त्याचाही अद्याप काही उपयोग झालेला नाही. दरम्यान, या बाबत महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त आर. एम. विमला यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

याबाबत बोलताना पन्नालाल सुराणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.'' सर्व शासकीय नियमांची पूर्तता करूनच आम्ही संस्था चालवितो. त्यात कोठेही किंचितही खोट नाही. तरीही प्रत्येक वेळी त्रुटी काढल्या जात आहेत. हा अनुभव विषण्ण करणारा आहे. चांगले काम करताना असे अडथळे आले तर आम्ही आमचे काम करायचे कसे ? '' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com