Pune Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अचानक काल (ता.१०) अनपेक्षितपणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पी़डीसीसी बॅंक) संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातच नाही,तर राज्याच्या सहकार क्षेत्रातही मोठी खळबळ उडालेली आहे. त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याचीह चर्चा लगेचच सुरू झाली आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर `पीडीसीसी`बॅंकेत आणखी मोठा उलटफेर होण्याची शक्यता असून अध्यक्षपदाचा चेहराही बदलाची माहिती पुढे येत आहे.
उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री म्हणून जबाबदारी वाढल्याने अजित पवारांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वीही या पदांसह इतर मोठ्या जबाबदाऱ्याही एकाचवेळी अत्यंत कुशलपणे त्यांनी सांभाळलेल्या आहेत. असे असताना आताच का जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या गटाची नव्याने बांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.कारण पक्षाच्या दोन्ही गटाचा पुणे जिल्हा हाच बालेकिल्ला असून तेथेच दोघांनीही मोठा जर नव्याने बांधणीसाठी लावलेला आहे. फूट पडल्याने विखुरलेली ताकद पुन्हा गोळा करण्याचा त्यांचा मानस आहे.
दरम्यान, अजितदादांच्या राजीनाम्यावर पीडीसीसीत कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा लगेच सुरू झालेली आहे. त्यांच्याच अत्यंत जवळच्या, तरुण व्यक्तिमत्वाची तेथे वर्णी लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.त्यातूनच राजकारणात २०१९ ला पाऊल ठेवलेले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ यांचे नाव पुढे आले आहे.गत लोकसभेला मावळात त्यांचा पराभव झाला. पुन्हा तेथून आगामी लोकसभेला निवडून येण्याची आताच्या राजकीय स्थितीत शक्यता दिसत नाही. म्हणून राजकारणात पुन्हा त्यांचा चंचूप्रवेश हा पीडीसीसीमार्फत करण्याचा दादांचा प्लॅन असल्याचे समजते.
गेल्या तीन दशकांपासून अजित पवार हे पीडीसीसीच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. १९९१ पासून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या बँकेने प्रगती केली. ते प्रथम संचालक झाले, त्यावेळी बँकेची उलाढाल ५५८ कोटी रुपये होती.त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आता ती वीस हजार ७१४ कोटीवर गेली आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरीही ते मार्गदर्शन करत राहतील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी दिली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.