पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वर्धापन दिवस आज पुण्यात साजरा झाला.या कार्यक्रमात स्वत: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीच त्यांचे वजन वाढण्याचे कारण सांगितले. गेली दोन वर्षे आपल्या सर्वांसाठी संकटाची होती.माझ्यावरही संकटे आली. आधी हात ‘फ्रॅक्कर’ व नंतर पायाची छोटी शस्त्रक्रिया यामुळे व्यायामावर मर्यादा आल्या. परिणामी वजन वाढल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आज पुण्यात झाला.पक्षाचा वर्धापन दिवस पहिल्यांदाच पुण्यात झाला.यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना उद्देशून ठाकरे म्हणाले, ‘‘ माझ्या तब्बेतीबद्दल आणि वाढलेल्या वजनाबद्दल तुम्ही एकमेकांच्या कानात चर्चा करीत असाल.मात्र, गेल्या दोन वर्षात आपणा सर्वांवर कोरोनाचे संकट आले. तशी माझ्यावरही काही संकटे आली. आधी हात ‘फ्रॅक्चर’ झाला. त्यात तीन-चार महिने गेले. नंतर पायाची छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून पुणे बरे होण्यास वर्षभराचा कालावधी गेला. त्यामुळे व्यायाम करता आला नाही. परिणामी वजन वाढले.’’
मनसेच्या आजच्या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती.सुमारे तीन हजार आसनक्षमता असलेल्या गणेश कला क्रिडा केंद्रात पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते जमले होते.सभागृहात उभे राहण्यासाठीदेखील जागा नव्हती. परिणामी अनेकजण बाहेर उभे होते. कोणत्याही प्रकाराची सत्ता नसतानादेखील राज ठाकरे यांची ‘क्रेझ’ कायम असल्याचे हे निदर्शक होते.गर्दीमध्ये मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय होती.तरूणांची संख्यादेखील मोठी होती.
आपल्या संपूर्ण भाषणात ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून सुरू असलेले छापासत्र, त्यावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तसेच राज्य सरकार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.वृत्त वाहिन्यांवर बोलताना तुम्ही शिव्या देता.तुम्ही जाहीरपणे ही भाषा वापरत असाल तर तिकडे जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींमध्ये कोणती भाषा वापरली जात असेल याचा विचार करा, असे ठाकरे म्हणाले. आज आपण फार बोलणार नाही. आज केवळ ट्रेलर आहे. पिक्चर पाडव्या दिवशी दोन एप्रिला असेल. तिकडे मोठ्या संख्येने या असे सांगत पाडव्याच्या शिवतीर्थावरील मेळाव्याचे निमंत्रण दिले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.