
शिर्डी : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यभरात युवा वाॅरीअर्स ही युवकांची आणखी एक नवी आघाडी उघडण्यास भाजपने सुरवात केली आहे. नगर जिल्ह्यात या पहिल्या आघाडीचा प्रारंभ शिर्डी येथे पक्षाचे उत्तर नगरजिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याबाबत माहिती देताना वाॅरीअर्स आघाडीचे शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर म्हणाले, अठरा ते पंचवीस वयोगटातील युवकांसाठी राज्यभर युवा वाॅरीअर्सच्या शाखा सुरू केल्या जातील. शिवजयंतीचे औचित्य साधून सिंहगडावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत(दादा) पाटील व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
कला, संस्कृती व क्रिडा क्षेत्रात रूचि असणाऱ्या युवकांचे संघटन या निमित्ताने बांधण्यात येईल. त्यांच्यासाठी विवीध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्याचे राज्यव्यापी नियोजन करण्यात आले आहे.
नगर जिल्हात शिर्डीतून त्याचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी राजेश शर्मा, सचिन शिंदे, किरण बोराडे, आघाडीचे उपाध्यक्ष रविंद्र गोंदकर, सुधीर शिंदे व राम आहेर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा...
शिवप्रेमींना वृक्षसंवर्धनाचा संदेश
राहाता : शिवप्रेमींना वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी अभियंता शरद निमसे यांनी आपल्या रोपवाटीकेत छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्राचा मजकूर असलेला फलक लावला आहे.
सातवन (सप्तपर्णी) या जंगली झाडाची आरमार बांधणीसाठी मालकाच्या परवानगीने तोडणी करण्यास हरकत नाही. मात्र, आंबा व फणस ही फळझाडे मुळीच तोडू नयेत, असा आदेश या आज्ञापत्रात देण्यात आला आहे. रोपवाटीकेस भेट देणाऱ्या वृक्षसंवर्धनाची प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी हा फलक लावला आहे.
शिवरायांच्या काळात आरमार बांधणीकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यासाठी लाकूड जमा करताना त्यांनी जारी केलेल्या आज्ञापत्रात, तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिंसाठी सातवना (सप्तपर्णी) सारखी जंगली झाडे मालकाच्या परवानगीने तोडावीत.आंबे व फणसाठी लाकडे त्यासाठी कामाची असली, तरी मुळीच तोडू नयेत. जनता लेकरासारखी काळजी घेऊन ही झाडे वाढवते. ती तोडल्यास त्यांना दुःख आणि धन्याचा पदरी प्रजापिडनाचा दोष पडतो, हे लक्षात घ्या, असे आदेश या आज्ञापत्रात देण्यात आले आहे
याबाबत माहिती देताना निमसे म्हणाले, की सातवन हे जंगली झाड झपाट्याने वाढते. त्याचे लाकूड वजनाला हलके व आरमार बांधणीस उपयुक्त समजले जायचे. आंबा व फणस ही समुद्रकाठी जोपासली जाणारी फळझाडे त्यासाठी उपयुक्त असली, तरी ती उशीरा वाढतात. त्यांचे संवर्धन करावे लागते. फळांसाठी त्याची लागवड केली जाते. त्यामुळे ही उपयुक्त आरमार बांधणीसाठी झाडे तोडू नका, अशा आशयाचे आज्ञापत्र शिवरायांनी जारी केले होते. आवश्यक ते लाकूड विकत आणा, अशी सूचना संबंधितांना दिली होता.
Edited By- Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.