शिरपूर : अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांचे शिरपूर शहरात (Shirpur city) खुप विकासकामे (Devolopment) आहेत. त्यांचा पराभव करणे भाजपला (BJP) शक्य नव्हते. मात्र काहीही करून शिरपूरमध्ये कमळ (Operation lotus) फुलवायचे असल्याने आम्ही गुजरातची (Gujrat) हॅाटलाईन (Hotline) वापरली अन् अमरीशभाई पटेल यांनाच भाजपमध्ये आणले, असे गुपित भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काल उलगडले.
विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांना भाजपमध्ये कसे आणले, त्याचे गुपित आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले. तर त्यांनीच अमरिशभाईंकडे केलेल्या मागणीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हसतखेळत तंबी दिली. त्यामुळे फडणवीस- महाजन यांच्या मैत्रीपूर्ण जुगलबंदीने सायंकाळ चांगलीच रंगली.
श्री. फडणवीस यांच्या हस्ते तांडे व असली परिसरात श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ व शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन शैक्षणिक वास्तूंचे १८ सप्टेंबरला उद्घाटन झाले. नंतर मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या प्रांगणात निवडक लोकप्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
शिरपूरमध्ये कमळ फुलवा
अमरिशभाईंच्या शाळा पाहून भारावलो, असे सांगत श्री. महाजन यांनी एक खंत मांडली. विद्यार्थिदशेत अशा शाळेत असतो, तर चांगला सीए झालो असतो. लाखोंनी कमाई केली असती. उगाच कशाला आमदार झालो असतो, असे त्यांनी म्हणताच हशा पिकला.
उत्तर महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात आला, तरी शिरपूरचा गड मात्र सर करता येईना. मी पडलो संकटमोचक, नेते फडणवीस यांनी आज्ञा केली. काही झाले तरी शिरपूरमध्ये कमळ फुलवा. मग शिरपूरला गुपचूप यायचो, विकासकामे बघायचो. गणित काही जुळेना. शिरपूर ताब्यात घेणे जमणार नाही, असे श्री. फडणवीस यांना सांगितले. मग थेट अमरिशभाईंनाच आपल्यात आणा, असे फर्मान निघाले. कमी पडलो तेव्हा गुजरातची हॉटलाइन वापरली. अखेर अमरिशभाई भाजपमध्ये आले, अशा शब्दांत श्री. महाजन यांनी अमरिशभाईंच्या प्रवेशाचे गुपित उलगडले.
फडणवीस यांची तंबी
अमरिशभाई काँग्रेसमध्ये होते, तेव्हा एसव्हीकेएममध्ये माझ्या शब्दाखातर किमान दोन अॅडमिशन होत होत्या, आता ते आमच्यात आले तर एकच अॅडमिशन देतात. आमचा कोटा तीनपर्यंत तरी वाढवा, अशी मागणी श्री. महाजन यांनी करताच खसखस पिकली. त्यांच्या मागणीचा धागा पकडत श्री. फडणवीस म्हणाले, की अमरिशभाईंनी शिफारशीवर अॅडमिशन दिल्या असत्या, तर उच्च गुणवत्ताधारक तयार करणाऱ्या संस्था उभारणे शक्य झाले नसते. त्यांनी गुणवत्तेचा आग्रह धरल्यामुळे उच्च वेतनश्रेणीप्राप्त विद्यार्थी घडविणे शक्य झाले. अमरिशभाई, तुम्ही एकही अॅडमिशन शिफारशीवर केली नाही तरी चालेल, पण गुणवत्तेशी तडजोड करू नका. महाजन आणि माझ्यासारख्यांना तर अशा संस्था कितपत चालवता आल्या असत्या याबाबत शंकाच वाटते, असे श्री. फडणवीस यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. श्री. महाजन आणि आमदार जयकुमार रावल आमच्याकडची दोन छाप टाकणारी व्यक्तिमत्त्वे आहेत, असेही ते म्हणाले.
फडणवीस झाले मुख्याध्यापक
असली येथील आश्रमशाळेच्या इमारतीची श्री. फडणवीस पाहणी करताना अमरिशभाई व आमदार रावल एका वर्गातील बाकावर बसून होते. योगायोगाने श्री. फडणवीस त्या वर्गात गेले तेव्हा त्यांना आमदारद्वयींनी उभे राहून गुड इव्हिनिंग सर म्हटले. तुम्ही आमचे मुख्याध्यापकच आहात, असे श्री. रावल यांनी सांगताच पुन्हा खसखस पिकली.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.