आमदार भालकेंनी दंड थोपटले, तर मुलगा भगिरथ यांनी बैठका मारल्या!

कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट केलेल्या पैलवान भारत भालके यांनी राजकीय आखाड्यात सलग तीन वेळा तीन मातब्बरांना अस्मान दाखवले.
आमदार भालकेंनी दंड थोपटले, तर मुलगा भगिरथ यांनी बैठका मारल्या!

पंढरपूर - कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट केलेल्या पैलवान भारत भालके यांनी राजकीय आखाड्यात सलग तीन वेळा तीन मातब्बरांना अस्मान दाखवले. कुस्तीत समोरच्या पहिलवानाला आव्हान देण्यासाठी दंड थोपटले जातात आणि कुस्ती जिंकल्यानंतर दोन्ही हात वर करून आनंद व्यक्त केला जातो. त्याच पद्धतीने काल भालके यांनी विजयी मिरवणुकीत दोन्ही हात वर केले आणि नंतर दंड थोपटून `मी शरद पवारांचा पट्टा आहे' असे म्हणत विरोधकांना पुन्हा आव्हान दिले. त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी देखील वडिलांनी सलग तीन विजय मिळवल्याचा आनंद म्हणून तिथेच पहिलवानी पद्धतीने तीन बैठका मारून आनंद व्यक्त केला.

सरकोली तालुका पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबातील भारत भालके यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. कुस्तीच्या आवडीमुळे कोल्हापूरला राहून त्यांनी तालमीत कुस्तीचे धडे गिरवले आणि अनेक पैलवानांना चितपट केले.

भालके यांनी 2009 मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, 2014 मध्ये प्रशांत परिचारक आणि काल ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक अशा तीन दिग्गज नेत्यांना विधानसभेच्या राजकीय आखाड्यात अस्मान दाखवले. 

विजयाची हॅट्ट्रिक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी भालके यांना टेम्पोवर बसवून त्यांची वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. शिवाजी चौकात ही मिरवणूक येण्यापूर्वी भालके यांचे पुत्र भगीरथ यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. 

परिचारक घराण्यातील कोणीही मैदानात या. चितपट करू, असे आव्हान देत वडिलांनी सलग तीन वेळा मोठा विजय मिळवल्याचा आनंद व्यक्त करताना भगीरथ यांनी व्यासपीठावरच पैलवानी पद्धतीने तीन बैठका मारल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले.

भारत भालके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी बोलताना श्री. भालके म्हणाले, दोन वर्षांपूर्वीच आपण काही कच्च्या गुरुचा चेला नाही असे सांगितले होते. मी शरद पवारांचा पट्टा आहे. सुधाकरपंत परिचारक यांना हरवून कै. औदुंबर आण्णा पाटील, कै. यशवंतभाऊ पाटील आणि कै. वसंतराव काळे यांच्या पराभवाचा वचपा जनतेच्या आशीर्वादामुळे काढता आला, असे त्यांनी नमूद केले आणि अखेरीस कुस्ती जिंकल्याप्रमाणे दोन्ही हात वर करून विजयी भावमुद्रेने दंड थोपटून पुन्हा विरोधकांना आव्हान दिले. पैलवान भालके यांचा हा आवेश आणि उत्साह पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com