
गुहागर : लोकसभा निवडणुकीत युती व आघाडीच्या पारंपरिक मतदारांनी आपल्या उमेदवाराला मतदान केले. भाजपने प्रचारात सहभाग घेतला नाही पण मतदान गीतेंनाच केले. नवमतदारांनीही मोदींवर विश्वास टाकला. म्हणूनच गीतेंना गुहागर विधानसभा मतदारसंघात 2280 चे मताधिक्य मिळाले. नोटा आणि अपक्ष उमेदवारांच्या मतात घट झाली.
यावरून मतदारांनी सुज्ञपणे आणि आपापल्या निष्ठांप्रमाणे मतदान केले, असा निष्कर्ष काढता येतो. त्यामुळे ना भास्कर जाधवांवर ना विनय नातूंवर पर्यायाने भाजपवर मदत न केल्याचा आरोप करता येत नाही. शिवसेनेचा जो काही तोटा झाला असेल, तर तो गींतेमुळे अथवा शिवसेनेने स्वीकारलेल्या व्यूहरचनेमुळे.
गुहागर विधानसभा क्षेत्रात तटकरेंना 61हजार 364 मते मिळाली. 2014 च्या तुलनेत त्याना 1 हजार 759 मते अधिक मिळाली. विधानसभेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला मतदान करणाऱ्यांनी (75 हजार 840) यावेळी तटकरेंना मतदान केले नाही, असा निष्कर्ष या आकड्याआधारे काढता येतो. याचा अर्थ जिल्हा परिषद गटातील प्रचारसभांचे पवारांच्या सभेचे रूपांतर मतांमध्ये झाले नाही. आघाडीच्या मतदारांनीने तटकरेंना मते दिली नाहीत, हे आकड्यांचे वास्तव आहे.
याउलट युतीचा मतदार गीतेंना कौल देऊन गेला. भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह सर्व कार्यकर्ते युतीच्या प्रचारापासून दूरच होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेबद्दल प्रचारा दरम्यान शंका उपस्थित केली जात होती. गीतेंच्या पराभवानंतर प्रथम भाजपकडेच बोट दाखविले.
मात्र आकडेवारीत गीतेंना गुहागरमधून मताधिक्य मिळाल्याचे समोर आले. परिणामी भाजप आणि नातूंच्या टीकाकारांची तोंडे गप्प झाली. कुणबी समाजातून गीतेंना मतदानाबाबत यावेळी संमिश्र चर्चा होती. युवावर्ग नाराज होता. परंतु 2014 च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी कुणबी समाजाने गीतेंनाच मतदान केल्याचे समोर आले.
2014 च्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यावेळी 6 हजार 077 मतदान कमी झाले. त्याचप्रमाणे नोटा (1874) आणि अपक्ष उमेदवारांच्या मतातही 7 हजार 413 मतांची घट आहे. याचा अर्थ मत कोणाला द्यायचे याचा निर्णय मतदारांनी आधीच केला होता. नवमतदारांनी मोदींवर विश्वास टाकला. परंतु परगावी असलेले मतदार यावेळी मतदानासाठी गावी आले नाहीत. या मतदारांना आणण्याची व्यवस्था केली असती, तर गीतेंच्या मताधिक्यात वाढ झाली असती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेऊनही मतदानावर फार मोठा परिणाम झाला नाही. फार तर मतदान करण्यास अनुत्सुक असलेले काहीजण मतदानाकडे वळले, असे म्हणता येईल. कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मतदानामध्ये जीव ओतला नाही, तर शिवसेनेने परगावातील मतदारांना आणण्याची तसदी घेतली नाही. परिणामी सुप्त मोदी लाटेचा म्हणावा तेवढा फायदा गीतेंना मिळाला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.