कॉंग्रेसचा गड भेदण्याचे भाजपसमोर आव्हान 

प्रचाराचा कालावधी संपत येत असताना या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना व भाजप अशी त्रिशंकू अवस्था राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कॉंग्रेसचा गड भेदण्याचे भाजपसमोर आव्हान 
Published on
Updated on

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात आजवर कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली बुलडाणा जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्याचे ध्येय भाजपसमोर आहे. सत्तेत असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता टिकवून ठेवण्याची धडपड करावी लागणार आहे. यावेळी नव्याने रिंगणात उतरलेल्या भारिप बहुजन महासंघालादेखील चांगले यश मिळविण्याची अपेक्षा आहे. प्रचाराचा कालावधी संपत येत असताना या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेना व भाजप अशी त्रिशंकू अवस्था राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

वऱ्हाडाच्या राजकारणात महत्वपुर्ण समजली जाणारी बुलडाणा जिल्हा परिषदेची निवडणूक काहीही झाले तरी आपण जिंकायची या जिद्दीने भाजप कामाला लागलेला आहे. जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे व प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी आपापल्या भागात जोर लावल्यास भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात, अशी परिस्थिती आहे. मात्र एक हाती सत्ता मिळविण्याचे स्वप्न कोणत्याही राजकीय पक्षाच्या आवाक्‍यातली नाही हे स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देखील चांगले वजन आहे. हे दोन्ही पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, नाझेर काझी, संगीतराव भोंगळ आदी प्रचारात आहेत. 

कॉंग्रेसलाही पराभवातून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. भाजपने घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय व शेतमालाचे पडलेले भाव या विरोधात राण उठवून मतदारांना ते आकर्षित करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बुलडाण्यात सभा घेऊन केंद्र व राज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्याचे आवाहन केले आहे. 

भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील जिल्ह्यात सभा घेऊन परिवर्तनाची हाक दिली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील मतदारांना नोटाबंदी व शेतमालाच्या पडलेल्या भावावरून भाजप विरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. 

वास्तविक पाहता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी या ठिकाणी होणे अपेक्षीत होते. मात्र ते न झाल्याने दोन्ही पक्षांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. याचा फायदा सहाजीकच भाजप किंवा शिवसेनेला होऊ शकतो. युतीतील हे दोन्हीही घटकपक्ष आज कितीही भांडत असले तरी निकालानंतर एकत्र आले तर या जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस ऐवजी युतीचा भगवा फडकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com