बंडखोरांना रोखण्याचे आता शिवसेनेसमोर आव्हान ! 

बंडखोरांना रोखण्याचे आता शिवसेनेसमोर आव्हान !
बंडखोरांना रोखण्याचे आता शिवसेनेसमोर आव्हान !
Published on
Updated on

मुंबई - शिवसैनिकांच्या मनातील भावना ओळखून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडण्याचा धाडसी निर्णय घेतला असला तरी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत शिवसेनेकडून अधिकृत तिकिट न मिळाल्याने शिवबंधनाचा धागा तोडून भगवा झेंडा खांद्यावरुन दूर करत अनेक सेना पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. सेनेकडून बंडोबांना थंड केले नाही तर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह अनेक उमेदवारांना बंडखोरांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई महापालिकेत 1992 पासून सातत्याने निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका,माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी परळ भोईवाडा येथील प्रभाग क्रमांक 202 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, जाधव यांच्या उमेदवारीला स्थानिक नगरसेवक नंदकुमार विचारे यांच्यासह शाखेतील पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. तरीही पक्ष नेतृत्वाने श्रदधा जाधव यांना एबी फॉर्म दिल्याचे समजताच, शाखेतील तीन महिला पदाधिकारी मिरा निंबाळकर, साधना राउळ आणि तुप्ती मोरे यांनी अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 202 मधून अर्ज दाखल केला. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतही मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. दहिसर प्रभाग क्रमांक 6 येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख गजानन साळवी यांनी अखेरच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक 4 केतकीपाडा येथून सुनील गिम्बल या शिवसैनिकाने अपक्ष अर्ज दाखल केला. गिम्बल हे 5 वर्षे उपशाखाप्रमुखपदी कार्यरत होते. पक्षात शिवसैनिकांना महत्व दिले जात नसल्याची तक्रार गिम्बल यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 6 आंबेवाडीमधून विभागप्रमुख प्रकाश कारकर यांचे पुत्र हर्षद कारकर तर केतकीपाडा 3 मधून बाळकृष्ण ब्रीद यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 4मधून महिला उपविभाग प्रमुख मीना पाणमंद, 12 मधून महेश शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान सेना महापौर स्नेहल आंबेकर यांच्या गिरणगांवातील लोअर परळ येथील प्रभागातही स्थानिक शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, स्थानिकांची नाराजी दूर करत, त्यांनी दुपारी 3 वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला. 

दरम्यान, शिवसेनेच्या दोन विद्यमान नगरसेवक नाना आंबोले आणि बबलू पांचाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मुलुंडचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने भाजपच्या तंबूत जाण्याचा निर्णय घेतला. नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांचा भाजपाबाबत नाराजीचा सूर असल्याने शिवसेनेबाबत सहानुभूती असल्याचे दिसून येत आहे. परंतु, पक्षातंर्गत पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होणार नाही ना याची काळजी शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागामध्ये शिवसेनेने उमेदवार दिले असून , ज्या शिवसैनिकांनी नाराजीपोटी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांची समजुत समजूत काढण्यात येईल, शिवबंधनाची आठवण केली जाईल, असे शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी सांगितले. 
.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com