मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
पटोले म्हणाले, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे असतानाही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करुन रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कतृत्व व त्यांची किर्ती महान आहे. त्यांच्या पराक्रमाची महती सातासमुद्रापार आहे परंतु रामदास स्वामींना महाराजांचा गुरु दाखवून बुद्धीभेद केला जात आहे. कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, अश्या शब्दात पटोलेंनी कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला.
भारतीय जनता पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ मताची पोळी भाजण्यासाठी वापर करत असतो हे वारंवार दिसून आले आहे. मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते गप्प कसे?, असा सवाल उपस्थित करुन ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे दाखवून देत आहेत, अशी जोरदार टीका पटोलेंनी भाजपवर केली आहे.
दरम्यान, कोश्यारींनी केलेल्या या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून कोश्यारींनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि याबाबत माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व शिवप्रेमींकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.