यशवंतराव गडाख यांनी नेत्यांना फटकारले ! म्हणाले, जिल्हा बॅंक राजकीय धुडगूस घालण्याची संस्था नाही

ही बॅंक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रगतिपथावर ठेवण्याचा प्रयत्न मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला आहे.
Yeshvantrao gadakh.png
Yeshvantrao gadakh.png
Published on
Updated on

नेवासे : "जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेची निवडणूक सुरू झाली आहे. जिल्हा बॅंक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही,'' असा टोला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमाशी बोलताना लगावला. 

गडाख म्हणाले, "ही बॅंक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रगतिपथावर ठेवण्याचा प्रयत्न मोतीभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला आहे. सर्व ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा संस्था जिल्हा बॅंकेवर अवलंबून आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्हा बॅंकेवर बेकायदेशीर नोकरभरतीसह अनेक आरोप झाले. तसेच, जवळजवळ शंभर कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकलेले आहेत. ते वसूल होतील की नाही, हे माहीत नाही. अनुत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण खूप वाढलेले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बॅंकेची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. अशा अवस्थेत बॅंकेकडे लक्ष देण्याची गरज आहे.'' 

""मंत्री बाळासाहेब थोरात मोठे नेते आहेत; मात्र त्यांचे जिल्हा बॅंकेकडे लक्ष नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली जिल्हा बॅंक बुडाली, तर जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा संस्था, तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. तसेच पक्षीय राजकारणविरहित बॅंक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत व बॅंक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा, तरच बॅंकेचे भवितव्य ठीक राहील,'' अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा..

जिल्हा बॅंकेच्या 21 जागांसाठी 195 उमेदवार रिंगणात 

नगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 195 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली. 

जिल्हा बॅंकेसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा, त्यानंतर अर्जांची छाननी करून त्यातून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा टप्पा संपला आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत माघारीसाठी वेळ असून, छाननीनंतर प्रक्रियेस वेग येणार आहे. 

बुधवारी झालेल्या छाननीमध्ये 312 दाखल उमेदवारी अर्जांपैकी 45 अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत, तर उमेदवारांनी दाखल केलेल्या एकापेक्षा अधिक अर्जांतून संबंधितांचे एकच नाव अंतिम केल्याने आता बॅंकेच्या संचालकांच्या 21 जागांसाठी 195 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातून दोन बिनविरोध निवडून येणार असल्याने, आता 19 संचालकांसाठी 193 उमेदवार रिंगणात राहणार आहेत. 

मतदारसंघनिहाय उमेदवारांची आकडेवारी 

छाननीनंतर सोसायटी मतदारसंघातून 59, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून 7, भटक्‍या-विमुक्त जमाती मतदारसंघातून 11, महिला राखीव जागांसाठी 28, ओबीसींसाठी 33, बिगरशेती 29 आणि शेतीपूरक मतदारसंघातून 28, असे एकूण 195 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 

अर्जमाघारीनंतरच ठरणार लढतीचे चित्र 

195 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले असले, तरी खरे चित्र अर्जमाघारीनंतर 11 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चुरस वाढली आहे. जामखेड, अकोले, नगर, नेवासे, पाथर्डी, कोपरगाव या सेवा संस्था मतदारसंघातील जागा बिनविरोध होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सर्वच जागा बिनविरोध करण्यासाठी नेतेमंडळींकडून प्रयत्न सुरू आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com