नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गमतीजमती होतात, तर चुरसही बघायला मिळते. भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, सासू-सुना असे नातेवाईक आमनेसामने उभे ठाकतात. त्यातून मतभेद अन् मनभेदही होतात. पण निवडणूक झाल्यानंतर सर्व विसरून वितुष्ट मिटावे, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उपदेशानुसार गुरुदेव सेवा मंडळाने अनोखा उपक्रम राबविला. ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
अर्धशतकाहून अधिक काळ सामुदायिक प्रार्थनेची परंपरा लाभलेले गाव म्हणजे तालुक्यातील पाथ्रड गोळे. अनेक प्रेरणादायी व प्रासंगिक उपक्रम राबविण्यात गाव आघाडीवर आहे. आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराचे मनोमीलन होऊन वितुष्ट कमी व्हावे व गावात एकोपा कायम राहावा, यासाठी मनोमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक लढलेल्या सर्व उमेदवारांना गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थना सभागृहात एकत्र बोलावून चहापानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
पाथ्रड या गावाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तुकडोजी महाराजांच्या विचारधारेवर पूर्वी जडणघडण होती. परंतु गाव पातळीवरील इलेक्शनमुळे एकमेकांच्या विरोधात मनामध्ये तेढ निर्माण होऊन मने दुभंगली. ग्रामपंचायतीच्या राजकारणामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले. वातावरण शांत होऊन गावात शांती व सदाचार राहावा, म्हणून गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने या मनोमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व उमेदवार व गावकऱ्यांनी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सामुदायिक श्रमदान घेण्याचा निश्चय केला. ‘झाले इलेक्शन जपा रिलेशन’, असा संदेश या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आला.
कार्यक्रमासाठी सर्व उमेदवार व प्रतिष्ठित गावकरी मंडळी उपस्थित होती. निवडणूक शांततेत पार पडली म्हणून पोलीस पाटील प्रफुल नेरकर ह्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढेही असेच शांततामय वातावरण राहावे, असं सांगत ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन.’ अशी अपेक्षा व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. गुरुदेव सेवा मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाने पंचक्रोशीत याची चांगलीच वाहवा होत आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.