महाविकास आघाडीतील नेत्यांच्या कानमंत्राने बदलली समीकरणे !

दिग्रसमध्येही माजी मंत्री संजय देशमुख यांची तालुक्यावर असलेली पकड या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक घट्ट झाली. संजय देशमुख यांनी आपल्या विरोधातील मिलिंद मानकर यांना धोबीपछाड करत दणदणीत विजय मिळविला. पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्याच मतदारसंघातील नेर व दिग्रस येथील पराभव जिव्हारी लागला.
YDCC
YDCC
Published on
Updated on

नेर (जि. यवतमाळ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. पण शिवसेनेचा वैयक्तिकरीत्या मात्र पराभव झाला असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे. कारण शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या पाच जागांपैकी तीन जागा जरी सेनेने राखल्या असल्या तरी दोन जागांवर मात्र पराभव झाला आणि या दोन जागा पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील नेर व दिग्रस होय. त्यामुळे हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी उमेदवारांना चांगले कानमंत्र दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

नेर येथील तालुका गटात शिवसेनेचे नगर उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या विरोधात अपक्ष शिवसेनेच्या खासदार भावना गवळी गटाचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांच्यात लढत होती. तुल्यबळ महाविकास आघाडीचे उमेदवार पवन जयस्वाल यांचा विजय जवळपास पक्का समजला जात होता. सोसायटीचे शिवसेनेकडे सतरा मतदान होते. या सोबतच काँग्रेसचे अकरा तर राष्ट्रवादीचे दोन मिळून चौतीस पैकी तीस मतदान आघाडीकडे होते. याउलट अपक्ष स्नेहल भाकरे यांच्याकडे मोजकीच मते होती. सुरुवातीला ही लढत वरवर शिवसेनेला सहज व सोपी वाटत होती. पालकमंत्री संजय राठोड यांच्याप्रमाणे पवन जयस्वाल हेसुद्धा आजपर्यंत अजय होते. एकंदर शिवसेनेचा विजयरथ या निवडणुकीपर्यंत अजय होता. परंतु एका अपक्षाने शिवसेनेचा अश्वमेध रोखत शिवसेनेला जोराचा झटका देत वस्तुस्थितीची जाणीव करून दिली.

महाविकास आघाडी असल्याने ही लढाई सोपी जाईल असे वाटत होते. संख्याबळाचे गणित विजयी पारडे दाखवत होते. परंतु मतदार संघातील राजकीय, जातीय समीकरणे, अस्तित्वाची लढाई, सत्तेची वाढती भूक, मान-अपमान, शोध-प्रतिशोध, अंतर्गत धुसफुस आदी बाबींमुळे निवडणूक जसजशी जवळ येत गेली, तसतशी समीकरणेही बदलत जात अपक्षाचे पारडे जड होत गेले.

या निवडणुकीत शिवसेनेची मते राखण्यातही शिवसेनेला अपयश आले. मित्र पक्षांनीही दगाफटका करत अपक्षाच्या पारड्यात आपली मते टाकत आघाडीचा धर्म वेशीवर टांगला. मुळात सहकार नेते बाबू पाटील जैत हे तालुका गटातून बँकेवर यापूर्वी प्रतिनिधी होते. यावेळी त्यांना डावलून पवन जयस्वाल यांना तिकीट देण्यात आले. यामुळे बाबू पाटील जैत यांच्या समर्थकांत प्रचंड रोष निर्माण झाला होता. नवख्या व दुर्बल समजल्या जाणाऱ्या स्नेहल भाकरे यांनी सहकारात असलेली आपली ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. हम भी किसीसे कम नही, हे त्यांनी यावेळी दाखवून दिले.

या निवडणुकीत शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला. सहकार क्षेत्राची निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते. शिवसेनेने या निवडणुकीला हलक्यात घेतल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. स्नेहल भाकरे यांनी आपली अंतर्गत फिल्डिंग छुप्या पद्धतीने लावत मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळविले. छत्रीच्या जखमांवर मलमपट्टी करून काही वरिष्ठ नेत्यांच्या अदृश्य आशीर्वादाने त्यांना बळकटी मिळाली. सहकार क्षेत्रातील जुन्या जाणकारांशी असलेले त्यांचे वडिलोपार्जित संबंध स्वतःवर असलेला विश्वास यासोबतच सहकारातील इतर पक्षाच्या दिग्गजांनी केलेली मदत या भरवशावर त्यांनी विजयश्री खेचून आणली.

दिग्रसमध्येही माजी मंत्री संजय देशमुख यांची तालुक्यावर असलेली पकड या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक घट्ट झाली. संजय देशमुख यांनी आपल्या विरोधातील मिलिंद मानकर यांना धोबीपछाड करत दणदणीत विजय मिळविला. पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्याच मतदारसंघातील नेर व दिग्रस येथील पराभव जिव्हारी लागला असून मतदार संघातील यापुढील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो. शिवसेनेच्या वाटेला आलेल्या उर्वरित तीन जागांवर विजय प्राप्त झाला. यात जिल्हा गटातून राजुदास जाधव, दारव्हा येथून शंकरराव राठोड व  मारेगाव येथून संजय देरकर विजयी झाले. जिल्ह्यात भाजप समर्थीत सहकार विकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार टक्कर देत जिल्ह्यातील आपले अस्तित्व अधोरेखित केले.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com