महाराष्ट्राच्या हिताचा प्रत्येक निर्णय मुख्यमंत्री बाळासाहेबांना स्मरून घेतात..

सगळ्या राजकीय विश्लेषक, अभ्यासक आणि नेत्यांचे अंदाज चुकीचे ठरवत त्यांनी अत्यंत समर्थपणे शिवसेना संघटना आणि राज्य सांभाळले आहे.
Shivsena Leader Chandrakant Khaire Birthday wish to Cm Thackeray News
Shivsena Leader Chandrakant Khaire Birthday wish to Cm Thackeray News

औरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आज वाढदिवस. कोरोना संकटाच्या काळात आलेला हा वाढदिवस त्यांनी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक संवेदनशील, जंटलमन असे हे व्यक्तीमत्व आहे. शांत स्वभाव असला तरी प्रचंड संयमी वृत्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. (Every decision in the interest of Maharashtra is remembered by Chief Minister Balasaheb.Said, Shivsena Leader Chandrakant Khaire) शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून असो, की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत त्यांनी जे काही निर्णय घेतले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरूनच घेतले आहेत.

बाळासाहेबांच्या खोलीत त्यांच्या तसबिरीपुढे नतमस्तक होऊन त्यावर हात ठेवूनच ते कुठलाही महत्वाचा निर्णय घेतात हे मी स्वतः पाहिले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Maharahstra) त्यामुळेच त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य आणि राज्याच्या हिताचा, जनतेच्या कल्याणाचा ठरला.  गेली ३५-४० वर्ष मी शिवसेनेत काम करतोय, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी आमची ओळख आहे. उध्दव साहेब राजकारणात नव्हते तेव्हापासून माझा आणि त्यांचा सहवास आला.

बाळासाहेबांचा करारी रोखठोक बाणा, तर उध्दव साहेब हे शांत स्वभावाचे. हा फरक सोडला तर या दोन नेत्यांमध्ये फारसा फरक नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय आयुष्यात कधी तडजोडीचे राजकारण केले नाही, उध्दव साहेबांनीही ते केले नाही. परंतु राजकीय अपरिहार्यता आणि परिस्थीती पाहून काही निर्णय त्यांनी घेतले. राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना आणि मुख्यमंत्री म्हणून त्याचे नेतृत्व हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल.

बाळासाहेबांचा राजकीय वारसा लाभलेले, पण त्यांच्या विरुद्ध स्वभाव,विचारसरणी असलेले उध्दव ठाकरे शिवसेना कशी सांभाळणार असा प्रश्न उपस्थित केला गेला. तोच प्रश्न जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करायला निघाले, तेव्हाही केला गेला. मात्र सगळ्या राजकीय विश्लेषक, अभ्यासक आणि नेत्यांचे अंदाज चुकीचे ठरवत त्यांनी अत्यंत समर्थपणे शिवसेना संघटना आणि राज्य सांभाळले आहे.

संकटांना धिरोदत्तपणे तोंड दिले..

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राज्यावर अनेक संकट आली. कोरोना, नैसर्गीक वादळ, पूर आणि आता दरड कोसळण्याच्या घटना. पण संकटांना न घाबरता न डगमगता त्यांनी ही परिस्थिती हाताळली. ते घराबाहेर पडत नाहीत, राज्यात फिरत नाहीत, अशी टीका देखील त्यांच्यावर झाली, पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी केवळ राज्यातील जनतेला कोरोना सारख्या महामारीपासून सुरक्षित कसे ठेवता येईल, त्यासाठीच्या उपयायोजना, वैद्यकीय सुविधा याला प्राधान्य दिले.

घराबाहेर न पडता देखील समन्वयाने, अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून, त्यांना योग्य सूचना देऊन देखील काम करता येते हे उध्दव साहेबांनी प्रत्येक संकटाच्या काळात दाखवून दिले. जेव्हा गरज होती तेव्हा ते बाहेरही पडले, लोकांचे अश्रू पुसले, त्यांना पाहिजे ती मदत दिली. कोकणात पुराने हाहाकार उडाला, अनेकांचे जीव गेले, व्यापाऱ्यांची दुकाने वाहून गेली, घरं उद्धवस्त झाली तेव्हा, कोकणातील रस्त्यांवर चिखल तुडवत ते उतरले.

त्यांनी कोकणवासियांना धीर दिला, मदतीचा आश्वासक शब्द दिला. टीका करणारे टीका करत राहिले, पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयमाने आणि कृतीने जनतेची मनं जिंकली. देशभरातील सर्वेमध्ये आधी पाचव्या आणि आता पहिल्या क्रमांकावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत हे मान्यच करावे लागेल.

शिवसैनिकांना जपणारा नेता..

बाळासाहेबांचा स्वभाव रागीट होता, कुणी चुकले की ते त्याला रागवायचे, दरडवायचे, पण काही वेळाने जवळ घेऊन पाठीवरून हातही फिरवायचे.  मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी असो की सामान्य शिवसैनिक या प्रत्येकाची बाळासाहेब काळजी घ्यायचे, त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक द्यायचे. उद्धव साहेबांच्या अंगी देखील हे सगळे गुण आहेत. त्यांनाही एखाद्या गोष्टीचा राग येतो, पण ते तो व्यक्त करत नाहीत, पण त्यांचा अबोला असेल तेव्हा समोरच्याला हे लगेच लक्षात येते की आपले काही तरी चुकले.

पण हा राग कायम नसतो. कोरोना काळात लोकांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी आम्हाला दिले होते. ते स्वतः या काळात रात्रंदिवस काम करायचे, त्यामुळे शिवसैनिक देखील एका उर्जेने सर्वसामान्यांना मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते. मग वैद्यकीय मदत असेल, किराणा सामानाचे कीट वाटप, पाणी, कुणाला पैशाची मदत, जेवण दवाखान्यातून ने-आण करणे असेल, अशा सगळ्या प्रकारची मदत शिवसेनेने, शिवसैनिकांनी केली. शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याने कोरोना काळात सर्वाधिक मदतीचा हात लोकांना दिला.

शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच शहरावरील प्रमे कायम..

औरंगाबाद शहरावर जसे शिवसेनाप्रमुखांचे विशेष प्रेम होते तसे उध्दव साहेबांचे देखील आहे. लोकसभा निवडणुकीत जेव्हा माझा पराभव झाला तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. कन्नड येथील एका भाषणात त्यांनी लोकसभेला झालेला पराभव हा खैरेंचा नाही तर माझा असल्याचे म्हटले होते. परंतु या शहरासाठी त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाणी योजना शहराला दिली, शहरातील गुंठेवारीचा प्रश्न, सिडकोच्या घरांचे लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याचा निर्णय, कचऱ्याचा प्रश्न त्यांनी कायमस्वरूपी सुटावा यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

उत्कृष्ट छायाचित्रकार असलेले उद्धव ठाकरे आज राज्यात तीन पक्षांचे सरकार चालवत आहेत, पण आपल्या कामातून आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेतून सहाकारी पक्षाच्या नेत्यांची देखील मने त्यांनी जिंकली आहे. भविष्यात देखील त्यांच्या हातून या महाराष्ट्राची सेवा घडो, त्यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जावो, त्यांना आई तुळजाभवानी आणि एकविरा देवी उदंड आयुष्य आणि दिर्घायुरोराग्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसा निमित्त ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

(शब्दांकन ः जगदीश पानसरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com