
औरंगाबाद ः माजी केंद्रीय मंत्री काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या नोयडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नात रुद्राली पाटील यांनीच ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
चाकूरकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीतच आहेत. कोरोनाची पहिली लाट होती तेव्हा देखील चाकूरकर लातूर किंवा चाकूरमध्ये नव्हते. योग्य काळजी घेत त्यांनी स्वतःला कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवले होते. मात्र दुसऱ्या लाटेत त्यांना संसर्गाची लागण झाली.
लक्षणे दिसू लागल्यामुळे नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात आली. तिचा अहवाल पाॅझीटीव्ह आल्यामुळे त्यांना तातडीन नोयडाच्या यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ञ डाॅक्टारांची टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याचेही रुद्राली पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शिवराज पाटील चाकूरकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कळताच काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची नातेवाईकांकडे चौकशी केली. लातूर व मराठवाड्यातून देखील अनेकांनी फोन आणि मेसेजद्वारे चाकूरकरांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
रुद्राली पाटील यांनी या सर्वांचे आभार व्यक्त करत चाकूरकरांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी,यासाठी सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा, असे आवाहन देखील केले आहे.
शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नेते असून त्यांनी पक्ष व देशपातळीवर अनेक पदे भुषवली आहेत. इंदिरा गांधींपासून ते सोनिया व राहुल गांधी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
देशाचे माजी गृहमंत्री व दहाव्या लोकसभेचे सभापती राहिलेले चाकूरकर २०१० ते २०१५ दरम्यान पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. १९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर ते सर्व प्रथम निवडून आले होते. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये देखील अनेक मंत्रीपद भुषवली.
१९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.