नगर : संग्राम कामाला लाग. महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी आता पुन्हा ताकदीने उभा रहा. विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे काम केलेस. आता पुन्हा कामाला लाग, असा आदेश राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नगरचे सुपुत्र संग्राम कोते यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोते यांना काही दिवस मनक्याच्या विकारामुळे बरे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मागील दोन महिन्यांपूर्वी पवार यांनी कोते यांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली होती. तसेच लवकर बरे होऊन महाराष्ट्रात मोठे काम करायचे आहे, असे सांगितले होते. त्यानुसार कोते यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी पुन्हा सक्रीय होण्याचे आदेश दिले, असल्याचे कोते यांनी सांगितले.
2014 मध्ये राष्ट्रवादी पक्ष सत्तेच्या बाहेर होता. सप्टेंबर 2014 मध्ये विद्यार्थी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोते यांची निवड झाली होती. त्या वेळी राज्यात दुष्काळ होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी माफीसाठी राज्यात 18 मोर्चे काढले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकार्यालय नगर जिल्ह्यात व्हावे, यासाठी मोर्चे काढले. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी 23 मोर्चे काढले. असे एकूण राज्यभरात 53 मोर्चे काढून संग्राम कोते संपूर्ण राज्यभर पोहोचले होते.त्या वेळी एका जाहीर कार्यक्रमात कोते यांच्या कामाची दखल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. त्यांनी जाहीर काैतुक केले होते. याच काळात कोते यांनी महाविद्यालय तेथे राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काॅंग्रेसची शाखा हा उपक्रम राबविला. त्या वेळी 700 शाखा सुरू केल्या. त्यासाठी चार महिने राज्यभर ते फिरले. तसेच शरद व्याख्यानमालाही सुरू करून त्यामध्ये मान्यवरांची व्याख्याने झाली. उद्योजक राहुल बजाज, अरुण फिरोदिया, जब्बार पटेल, संगणकतज्ज्ञ विजय भटकर, ज्येष्ठ नेते जयंत पाटील अशा नामवंत व्यक्तींची व्याख्याने झाली.
कोते यांचे काम पाहून त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संधी दिली. त्या नंतरच्या काळात गाव तेथे राष्ट्रवादी काॅंग्रेस हा उपक्रम राबवून कोते यांनी पुन्हा राज्यात मुसंडी मारली. शहरी भागात प्रभाग तेथे युवक राष्ट्रवादी काॅंग्रेस अशा नवीन तब्बल बाराशे शाखा सुरू केल्या. तसेच विभागीय मेळावे घेतले. राज्यात सात ठिकाणी असे मेळावे झाले. या सर्व मेळाव्यांना अजित पवार स्वतः उपस्थित राहिले. तद्नंतर विविध प्रश्नांसाठी प्रत्येक महापालिकेवर मोर्चे काढले. राज्यातील 153 मतदारसंघात मेळावे घेतले. कोते यांचा राज्यभर झंजावत पाहून ते शरद पवार यांच्या अधिक जवळ गेले. तसेच अजित पवार यांच्या गळ्यातील ताईत बनले.
राज्यभर मोठे काम सुरू असताना कोते यांनी मोठा प्रवास केला. त्यातच त्यांना मणकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पक्षाने टाकलेल्या पदाला न्याय देता येणार नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः फेब्रुवारी 2019 मध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कोते यांचे काम अजित पवार यांच्या चांगले स्मरणात राहिले. त्यांनी जुलैमध्ये कोते यांना फोन करून विचारपूस केली व बरे वाटल्यानंतर भेटण्यासाठी बोलावले. नुकतीच भेट होऊन त्यांना कामाला लागण्याचे आदेश पवार यांनी दिले.
पक्ष कोणती जबाबदारी टाकणार, नगरकरांना उत्सुकता
संग्राम कोते यांचे विद्यार्थी व तरुणांमध्ये विशेष चाहते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस कोते यांच्यावर कोणती जबाबदारी टाकतात, राज्याचे कोणते पद त्यांच्याकडे देतात, याकडे नगर जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. मोर्चाच्या निमित्ताने हे सर्व कार्यकर्ते कोते यांच्या अधिक जवळ आहेत. त्यामुळे लवकरच पक्षाचे मोठे पद नगर जिल्ह्याकडे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम सुरू करणार : कोते
अजितदादांची भेट झाल्यानंतर आता पुन्हा नव्या जोमाने मी कामाला लागणार आहे. पक्ष वाढीसाठी पुन्हा सक्रीय होत आहे. पक्ष देईल ती जबाबदारी घेऊन आपण पक्षाच्या आदेशान्वये कामाला लागू, अशी प्रतिक्रिया संग्राम कोते यांनी `सरकारना`शी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.