त्याने कर्ज फेडण्यासाठी टाकला होता दरोडा, १४ तासांत लागला छडा..

मास्टर माइंड महेश श्रीरंग आणि इतर आरोपी हे बालपणीचे मित्र आहेत. महेशचे बालपण यवतमाळातच गेल्याने त्याने खास मित्रांच्या सहाय्याने ही योजना आखली. तिघांनी काही व्यवसाय सुरू केले होते. या व्यवसायातून त्यांच्यावर कर्ज झाले होते.
Muturrut Finance Wardha
Muturrut Finance Wardha

वर्धा : डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, या विंचनेत मुथूट फिनकॉर्पच्या शाखा व्यवस्थापकानेच भर दिवसा दरोडा टाकल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. १४ तासांच्या आत या दरोड्याचा तपास लाऊन पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. मित्राच्या मदतीने दरोड्याची योजना आखल्याचे शाखा व्यवस्थापक महेश अजाबराव श्रीरंग याने पोलिसांना सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्टर माइंड महेश, कुशल सरदारा आगासे, मनीष श्रीरंग घोळवे, जीवन बबन गिरडकर  आणि कुणाल धर्मपाल शिंदे सर्व राहणारे यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. दरोड्यात कुरिअर बॉय बनून आलेल्या व्यक्तीने चाकू आणि पिस्टलचा वापर केला होता. कुरिअर बॉयची भूमिका कुशल आगासे याने पार पाडली होती. चोरट्यांकडून दोन किलो ५५६ ग्रॅम सोने (किमत १ कोटी १५ लाख ४ हजार २५० रुपये), रोख ९९ हजार १२०, सील स्कूल बॅग, दोन कार असा एकूण ४ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांकडून आणखी मुद्देमाल जप्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटक केलेल्यांवर यापूर्वी इतर कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

काल, गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास येथील मुथूट फिनकॉर्पवर दरोडा पडला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. कर्मचाऱ्यांना विचारणा करताना व्यवस्थापकाच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला पोलिसी हिसका दाखविला. यावेळी त्याने पोलिसांसमोर सर्वच सत्याचा उलगडा केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इतर साथीदारांना यवतमाळ जिल्ह्यातील करळगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चोरीतील साहित्य, दुचाकी आणि दोन कार असे साहित्य जप्त केले. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माखनीकर, वर्धेचे उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम  कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, संतोष दरगुडे, अनिल कांबळे, प्रमोद पिसे, राजेश जयसिंगपूरे, पवन पन्नासे, संघसेन कांबळे, विकास अवचट, अभिजित वाघमारे, चालक भूषण पुरी यांनी केली. विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक केले.

इतर व्यवसायातून वाढले होते कर्ज 
मास्टर माइंड महेश श्रीरंग आणि इतर आरोपी हे बालपणीचे मित्र आहेत. महेशचे बालपण यवतमाळातच गेल्याने त्याने खास मित्रांच्या सहाय्याने ही योजना आखली. तिघांनी काही व्यवसाय सुरू केले होते. या व्यवसायातून निर्माण झालेल्या कर्जापोटी त्यांनी ही चोरीची योजना आखल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. यात आणखी काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

कारवाई करणाऱ्या पोलिसांना पारितोषिक 
अवघ्या काही तासांतच पोलिसांनी या दरोड्याचा छडा लावला. त्यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देणार असल्याची घोषणा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com