"हनी ट्रॅप' टाकणाऱ्या टोळ्यांचा नगरमध्ये धुडगूस, अनेक प्रतिष्ठित अडकतात `सापळ्यात`

"हनी ट्रॅप'च्या मार्गाने झटपट पैसा मिळविण्याचे उद्योग करणाऱ्या टोळ्यांनी सध्या नगर जिल्ह्यात अक्षरशः धुडगूस घातला आहे.
huny trap
huny trap

नगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना पुढे करून पोलिसांसह विविध खात्यांमधील अधिकारी, व्यापारी व धनिकांना खोट्या प्रेमाच्या मोहजालात ओढायचे. नंतर त्यांच्यासोबत अनैतिक कृत्ये करायची. ती सुरू असतानाच संबंधित ठिकाणी "छापा' घालायचा. संबंधित व्यक्तीवर दहशत निर्माण करून त्यांचे चित्रीकरण करायचे. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन "भाव' वाढवायचा. नंतर "मांडवली' करून पाच ते वीस लाखांपर्यंतची रक्कम उकळायची आणि त्यातून चैनबाजी करायची... अशा "हनी ट्रॅप'च्या मार्गाने झटपट पैसा मिळविण्याचे उद्योग करणाऱ्या टोळ्यांनी सध्या नगर जिल्ह्यात अक्षरशः धुडगूस घातला आहे. 

विशेष म्हणजे चांगल्या घरातील महिला या टोळीच्या केंद्रस्थानी असून, काही टोळ्यांचे सूत्रधारच या महिलांचे पतिराज असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. 
नगर शहर व जिल्ह्यात या टोळ्यांचे उद्योग गेल्या काही महिन्यांपासून भलतेच तेजीत आहेत. जिल्ह्याच्या ठरावीक भागात पुण्या-मुंबईसह परराज्यांतील व्यापारी व पैसेवाल्यांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार सर्रास घडत असत. या कामांमध्ये गुन्हेगारीशी नाव जोडलेल्या ठरावीक समाजातील मंडळी असते. टोळीचा म्होरक्‍या मात्र त्या-त्या भागातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वजनदार व्यक्ती असते. कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्याचा हा एक फंडा जिल्ह्यात जोरात सुरू असतानाच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैसे कमावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील, तसेच जातिधर्मांतील मंडळी असून, त्यामध्ये महिलांचा "रोल' महत्त्वाचा असतो.
काही टोळ्यांना राजकीय अथवा इतर क्षेत्रांतील वजनदार मंडळींचे "आतून' पाठबळ असते. काही टोळ्यांना पोलिसांचेही "अभय' मिळत असते. काही ठिकाणी पोलिस कर्मचारीच या टोळ्यांचे घटक असतात. टोळीच्या "मोहिमे'त बळी पडलेली व्यक्ती सामाजिक, आर्थिक, राजकीय, शिक्षण अशा क्षेत्रातील नामांकित व्यक्ती असते. त्यामुळे केवळ इज्जत जाण्याच्या भीतीपोटी संबंधितांकडून टोळी लाखो रुपये बिनबोभाटपणे उकळण्यात सहज यशस्वी होते. काही उद्योजकही या टोळ्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. निर्भीडपणे काम करणाऱ्या व आपल्या या अनैतिक मार्गात अडसर ठरण्याची भीती असलेल्या, प्रामाणिक पत्रकार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आता या प्रकारात गुंतविण्याची व्यूहरचना काही टोळ्यांनी चालविल्याचे वृत्त हाती आले आहे. दरम्यान, टोळीतील महिला व पुरुष गुन्हेगार आणि बळी पडलेल्यांमध्ये गुप्त "समझोता' होत असल्याने पोलिसांनाही या घटनांची "खबर' लागत नाही. परिणामी, अशा टोळ्यांवर कारवाई करण्यास पोलिसांना मर्यादा येत आहेत. तथापि, सामाजिक काम करणारी काही मंडळी मात्र आता या टोळ्यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

अशी आहे टोळ्यांची कार्यपद्धती!
- मोठ्या पदावरील अधिकारी, व्यापारी व पैसेवाल्यांचा शोध घेणे.
- टोळीतील महिलांना पुढे करून त्यांना सोशल मीडियावर जोडून घेणे.
- अर्धनग्न फोटो व अश्‍लील व्हिडिओ पाठवून त्यांच्याशी सलगी करणे.
- त्यानंतर अनैतिक कृत्ये करण्यासाठी संबंधितांना भाग पाडायचे.
- "गिऱ्हाईक' किती वजनदार आहे, याची खातरजमा करून नियोजन करायचे.
- गरज भासल्यास मर्जीतील पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सहभागी करायचे.
- "शय्यासोबत' करायचे ठिकाण आणि त्या परिसरात "मोहीम' फत्ते होईपर्यंत "विशेष' लक्ष ठेवायचे.
- टोळीतील महिलेकडून "मोहीम' फत्ते झाल्याचा संदेश येताच "छापा' घालून दहशत निर्माण करायची.
- संबंधित व्यक्तीशी शय्यासोबत केलेल्या महिलेचे तातडीने फोटो काढायचे.
- कबुलीजबाबवजा व्हिडिओ चित्रित करून संबंधितांना तो व्हायरल करण्याची धमकी द्यायची.
- प्रकरण मिटविण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी करून काही लाखांमध्ये रक्कम उकळायची.
- त्या पैशांचे वाटप करायचे. काही पैसे सहल व पार्टीसाठी राखीव ठेवून "मोहीम' साजरी करायची.
- जेव्हा जेव्हा टंचाई भासेल, तेव्हा पुन्हा संबंधितांना धमकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे.

पैसा हीच जात अन्‌ पैसा हाच धर्म!
जातिधर्मांवरून सामाजिक विलगीकरण होऊन सामाजिक वातावरण दूषित होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येतात. मात्र, महिलांना पुढे करून "ब्लॅकमेलिंग' करणाऱ्या या टोळ्यांमध्ये विविध जातिधर्मांची मंडळी आहेत. त्यांच्यात मात्र "सामाजिक एकोपा' ठासून भरल्याचे दिसते. या मंडळींमध्ये जातिधर्मांबाबत चर्चाच होत नसल्याचे पुढे आले आहे. "पैसा हाच धर्म व पैसा हीच जात' हे सूत्र या मंडळींनी महत्त्वाचे मानले आहे. एवढे होऊनही पैशांच्या वाटणीवरून एखाद्याचे खटकलेच, तर तो निमूटपणे टोळीतून बाहेर पडतो आणि दुसऱ्या टोळीत प्रवेश करतो; परंतु पहिल्या टोळीतील भानगडी "शेअर' होणार नाहीत, याची खबरदारी मात्र घेत असतो.

नगरमधील "देव' माणूसही "दत्त' म्हणून सापडला कचाट्यात!
अनेक महिलांच्या घरी जाऊन गप्पा ठोकणे, त्यांच्याशी सलगी करणे, कपड्यांपासून विविध वस्तूंची आमिषे दाखवून त्यांचे "शोषण' करण्याचा धंदा करण्यात नगरमधील एक "देव'माणूस वाक्‌बगार आहे. दुर्दैवाने तो "ब्लॅकमेलिंग' करणाऱ्या टोळीच्या कचाट्यात "दत्त' म्हणून सापडला. टोळीच्या केंद्रस्थानी असलेल्या "मामी'च्या मोहजालात शिरकाव केल्यानंतर या "देवा'ला नगर शहराजवळील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे "योग्य' वेळ येताच "मामी'च्या सांकेतिक इशाऱ्यानुसार "टीम ब्लॅकमेलर' हजर झाली. "देव'माणसाची प्रारंभी धुलाई करून त्याच्यावर दहशत निर्माण करण्यात आली. "त्या' घटनेचे "लाइव्ह रेकॉर्डिंग' करण्यात आले. त्यानंतर "देव'माणसाचा कबुलीजबाबवजा व्हिडिओ तयार करण्यात आला. त्याच्या गळ्यातील सुमारे तीन लाखांची सोनसाखळी व रोख रक्कम तर घेतलीच; शिवाय "ऑन द स्पॉट' त्याच्याकडून पाच लाखांची अतिरिक्त वसुलीही करण्यात आली. आता गरज भासेल तेव्हा या "देव'माणसाची "आठवण' टोळीला येते. विशेष म्हणजे "देव'माणसाकडूनही इज्जतीपोटी त्यांची मागणी पूर्ण केली जाते. या "देव'माणसाचे वडील एक चारित्र्यसंपन्न व आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. "देव'माणसाच्या कुटुंबातील मंडळींच्या
"विनय'शीलता व "विनित'वृत्तीबाबत समाजात मोठा आदर आहे. अशा नामांकित खानदानी परिवारात जन्मलेला हा "देव'माणूस मात्र आपल्या आंबटशौकामुळे या कुटुंबाच्या लौकिकाला कलंक ठरल्याचे दुर्दैव आहे.

आम्ही करू पर्दाफाश
पोलिसांसह व्यापारी, अधिकारी व विविध समाजघटकांमधील मंडळींना महिलांच्या माध्यमातून "ब्लॅकमेल' केले जात असल्याच्या बातम्या आमच्या कानावर नेहमी येतात. केवळ बदनामीपोटी संबंधित व्यक्ती फिर्याद देण्यात धजावत नाहीत. आम्ही मात्र अशा मंडळींचा पर्दाफाश करून त्यांना "सबक' शिकविण्याचे काम करू. फसवणूक झालेल्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
- स्मिता अष्टेकर, सामाजिक कार्यकर्त्या, नगर

फिर्याद नसल्याने कारवाईस मर्यादा
महिलांच्या माध्यमातून "ब्लॅकमेलिंग' केले जात असल्याच्या तक्रारी चर्चेत असतात; परंतु त्याबाबत कोणी फिर्याद देत नसल्याने आम्हाला कारवाईला मर्यादा येतात. संबंधितांनी पोलिसांना कळविल्यास अशा मंडळींना सापळा लावून पकडता येईल. फसवणुकीनंतर फिर्याद दिली तरीही पोलिसांना कारवाई करता येईल. त्यासाठी न घाबरता पोलिसांकडे यायला हवे.
- सागर पाटील, अपर पोलिस अधीक्षक, नगर 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com