
औरंगाबाद: माझे बाबा हर्षवर्धन जाधव हे जनतेच्या कामासाठी मोठ्या नामांकित लोकांसाठी भांडले. शेतकरी, कामगार मजुर आणि कन्नड-सोयगाव मतदारसंघातील लोकांसाठी ते सतत काम करायचे, वाईटपणा घ्यायचे. अजूनही त्यांनी जनतेसाठी खूप काही करायचे आहे, सध्या ते अडचणीतून जात असले तरी त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव आदित्यवर्धन जाधव यांनी केली आहे.
पुणे येथील चड्डा दामप्त्याला मारहाण केल्याप्रकरणात हर्षवर्धन जाधव सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले आहेत. अशातच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि कौटुंबिक कलहापासून दूर जात कन्नड-सोयगांव मतदारसंघात नव्याने पाय रोवण्याची संधी आलेली असतांनाच जाधव यांना चड्डा मारहाण प्रकरणात तुरुंगात जावे लागले. तिकडे त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी मात्र पिशोर ग्रामपंचायत व इतर मोजक्या ठिकाणी पॅनल उभे करत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. अशावेळी हर्षवर्धन जाधव काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
अपेक्षेप्रमाणे हर्षवर्धन जाधव यांनी आपला मुलगा आदित्यवर्धन याला ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालण्याचा सूचना देऊन पुण्यातूनच पिशोरसह तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. जेमतेम सतरा अठरा वर्षाच्या आदित्यवर्धन या तरूणावर अशा बिकट परिस्थितीत राजकारणात उडी घ्यावी लागत आहे. पण आपण वडलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगत आदित्यवर्धन हे देखील आता मैदानात उतरल्याचे चित्र आहे. कन्नडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आदित्यवर्धन यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हर्षवर्धन जाधव हे पॅनल उभे करणार असल्याचे जाहीर केले.
हजरजबाबी, सडेतोड..
आदित्यवर्धन जाधव हे आपले वडील हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांच्या देहबोली आणि निवेदनातून स्पष्टपणे जाणवत होते. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच माझ्या वडलांनी आमदार असतांना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती कष्ट घेतले, आणि नामांकित लोकांशी ते कसे भांडले याची माहिती दिली. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, माझ्या वडीलांनी तालुक्यात ५० टक्के आणेवारी लावून घेतल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
तीन महिने शेतकऱ्यांनी वीज बील भरले नाही तरी आणेवारीच्या निकषामुळे वीज मंडळाला तुमची वीज तोडता येणार नाही, तसा जीआर आहे, तो तुम्हाला वेबसाईटवर पहायला मिळेल. कुणी शेतकऱ्यांची वीज तोडायला आले तर मला फोन करा, किंवा आमच्या कार्यकर्त्यांना फोन करा. या उपरही तुमची वीज कापली तर आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू, अस आदित्यवर्धन यांनी यावेळी सांगितले. आदित्यवर्धन यांच्या देहबोलीतून आणि मुद्दे मांडण्याच्या पद्धतीतून त्यांच्यावर वडलांची छाप असल्याचे जाणवते.
आदित्यवर्धन यांच्या निमित्ताने जाधव घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत असल्याचे बोलले जाते. हर्षवर्धन जाधव यांनी जेव्हा शिवसेनेचा राजीनामा देऊन स्वतःचा पक्ष काढला होता, तेव्हा आदित्यवर्धन यांनी सर्वप्रथम व्यासपीठावर उभे राहून भाषण केले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव विरुध्द संजना यांच्या संघर्षात आदित्यवर्धन नेमकी काय भूमिका बजावतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.