सांगली महापालिकेच्या भूखंडांचा बाजार रोखण्याचे आव्हान

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी दर सुधार समितीने विविध विभागात दरवाढ सुचवली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा झाली. प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी पावले उचलली ही आश्‍वासक बाब असली तरी या सभेत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक होत्या.
Sangli Corporators Angry on Administration over Land Plots
Sangli Corporators Angry on Administration over Land Plots

सांगली : सांगली महापालिकेच्या भूखंडांचा बाजार सुरु असल्याचे वाभाडे नगरसेवकांनीच विशेष सभेत काढले. शेकडो भूखंड महापालिकेच्या मालकीचे आहेत, मात्र त्यावर नावे लावण्यात प्रशासन करत असलेल्या दिरंगाईचा फायदा घेऊन त्यांचा बाजार मांडला आहे. हे रोखण्याचे आव्हान आयुक्तांसमोर आहे. कोट्यवधींची ही मालमत्ता पडून असताना ती उपयोगात आणण्याबाबत कोणतीही चर्चा होत नाही.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी दर सुधार समितीने विविध विभागात दरवाढ सुचवली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा झाली. प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी पावले उचलली ही आश्‍वासक बाब असली तरी या सभेत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक होत्या. त्यात सत्ताधारी भाजप आणि आयुक्त किती गांभीर्याने लक्ष घालणार हा प्रश्‍न आहे. नगरसेवकांनीच केलेली पोलखोल पाहता प्रशासनाचा कारभार कसा आहे हे लक्षात येते.

कोट्यवधींचे भूखंड हातात असताना त्यांचा काडीचाही उपयोग करण्याचा प्रयत्न महापालिका करत नाही. उलट त्यांच्याकडे वर्षानुवर्ष डोळेझाक केल्याने याच भूखंडांची विक्री जुन्या मालकांनी कलेक्‍टर एन.ए. प्रमाणपत्र घेऊन सुरु केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक विष्णू माने यांनी विजयनगर परिसरातील अशा भूखंडांची विक्री होत असल्याचे समोर आणले.

भूखंडांचा शोध सुरु

महापालिकेचे सुमारे आठशे ते एकहजार भूखंड आहेत. मात्र यातील अनेक भूखंडांवर अद्याप महापालिकेचे नाव लागलेले नाही. त्यांचा शोध घेऊन नावे लावण्याचे काम तत्कालीन आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यापासून सुरु आहे. पण, आजवर नेमक्‍या किती भूखंडांवर नावे लावली त्याची माहितीही प्रशासनाकडे नाही. हे भूखंड कोणत्या भागात किती आहेत तेही रेकॉर्ड ठेवल्याचे दिसत नाही. त्यामुळे भूखंडांची परिस्थिती रामभरोसे आहे.

थेट विक्रीच

विष्णू माने यांनी विजयनगर परिसरातील भूखंड विक्रीची पोलखोल केली तर गजानन मगदूम यांनी कुपवाडच्या मुख्य चौकातील महापालिकेच्या मालकीचा मोठा भूखंड परस्पर विकल्याची कागदपत्रेच आयुक्‍तांकडे सादर केली. हा प्रकारही धक्कादायक आहे. विजय घाडगे यांनीही अशा प्रकारच्या भूखंडांची विक्री होत असल्याची माहिती दिली. या सभेत उघड झालेल्या बाबी आहेत. अशा किती भूखंडांची विक्री झाली याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

मालकांना हाव सुटली

महापालिकेच्या ताब्यात भूखंड येऊन काही वर्ष उलटली. त्यावेळी या भूखंडांची किंमत कमी असेलही, पण आता जागांचे भाव गगनाला भिडल्याने आणि महापालिकेने हे भूखंड अद्याप स्वत:च्या नावावर न केल्याने मूळ मालकांनाच पुन्हा या जागांचे वाढलेले भाव पाहून हाव सुटली असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेतील एजंटांना हाताला धरुन या जागा परस्पर विकण्याचा घाट घातला जात आहे. त्याला वेळीच आवर घातला नाही तर प्रशासनाला हात चोळीत बसावे लागेल.

जागा महापालिकेची उत्पन्न दुसऱ्याचे

असाच एक प्रकार कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी समोर आणला. सांगलीवाडीतील महापालिकेच्या मालकीची एक एकर जागा आणि बेडग रोडवरील पंधरा एकर जागा अजून मूळ मालक कसत आहेत. तेथे ऊसाचे पीक घेऊन हे मालक उत्पन्न मिळवत आहे. एकीकडे भूखंड विक्री आणि दुसरीकडे महापालिकेच्या जागेत ऊसाचे उत्पादन घेऊन दुसरेच उत्पन्न मिळवत आहेत. अन महापालिका उत्पन्नवाढीसाठी कर वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे.

महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांवर नावे लावण्याचे काम सुरु आहे. सभेत ज्या जागेची विक्री झाल्याचे सांगण्यात आले, त्याची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्याची चौकशी करु. कागदपत्रांचा घोळ करुन जर असा प्रकार झाला असेल तर जागा परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते प्रयत्न करु.
आयुक्त नितीन कापडणीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com