मेढा (ता. जावळी) : मेढयाच्या उत्तरेला असलेल्या मालदेव परिसरातील दिवदेव मार्ली घाटात दोन मुलांसह आई वडीलांचा असे संपुर्ण कटुंबांचे आर्थिक व्यवहाराच्या
देवाण घेवाणीतून निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. याप्रकरणी सोमर्डी येथील संशयित योगेश निकम याला पोलिसांनी अटक केली असून त्यानी या चौघांच्या
खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले
मृत कुटुंब सांगली जिल्ह्यातील बामणोलीचे असून मुलांना नोकरीला लावतो असे आमिष दाखवून सदर कुटुंबाकडून अनेकदा पैसे घेवूनही मुलांना नोकरीस लावले नाही. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी याकुटुंबाने तगादा लावल्याने संशयित नराधमाने पैशाच्या हव्यासापोटीच हे कृत्य केल्याचा पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे .
तानाजी विठोबा जाधव (वय 55), पत्नी सौ. मंदाकिनी जाधव (वय 50), मोठा मुलगा तुषार जाधव (वय 26) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय 20) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, (ता. मिरज, जि. सांगली) येथील राहणारे आहेत. खून प्रकरणी योगेश निकम (रा. सोमर्डी, ता. जावळी) या संशयिताला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मेढाच्या उत्तरेला दिवदेव - भिलार या मार्गावर मार्ली घाट लागतो. सुमारे 28 किलोमीटरचा हा घाट असून हा संपूर्ण मार्ग सुनसान आहे. या मार्गावर अत्यंत कमी
प्रमाणात वाहतूक असते. दिवसभरात एखादे-दुसरेच वाहन या घाटातून जाते. या घाटात 11 ऑगस्टला पोलिसांना पाहिला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता.
त्यानंतर याच मार्ली घाटात शनिवारी (ता. २९) आणखी एक अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
हे मृतदेह पती-पत्नीचे असल्याचे रविवारी पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ३१ रोजी एक मृतदेह व त्यानंतर आज (ता. एक) एक असे चार मृतदेह सापडले. दरम्यान पोलिस तपासात या चौघांचेही खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी सोमर्डी (ता. जावळी ) येथील योगेश निकम या युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे चारही खून केल्याचा कबुली जबाब दिल. त्यामुळे पोलिसांचे डोकेही चक्रावले. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात या चौघांचीही मिसिंग केस दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पती-पत्नीचे मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना मेढा पोलिस ठाण्यात ओळख पटवण्यासाठी बोलावले असता त्यांनी मृत व्यक्ती त्यांच्याच नात्यातील असल्याचे सांगितले आहे.
संशयित योगेश याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याने दोन मुलांचाही खून केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांचे मृतदेह शोधण्याची मोहिम सोमवारी दुपारपासून हाती घेतली. त्यानुसार संशयित योगेशला घटनास्थळी मार्ली घाटात नेण्यात आले. सोमवारी सायंकाळी एका मुलाचा मृतदेह सापडला. आज दुसर्या मुलाचाही मृतदेह सापडला आहे.
संशयिताने हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला असून त्यामुळे पोलिसही हादरून गेले. तुषार व विशाल या मुलांना मिल्ट्रीमध्ये भरती करतो, असे संशयित योगेश निकमने सांगितले होते. त्यानुसार या मुलांना संशयिताने सातारला बोलावले. तेथून त्यांना दिवदेव मार्ली घाटात मिल्ट्रीचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे सांगून नेले.
तेथे नेल्यानंतर या दोघांना गुंगीचे औषध देवून डोक्यात घाव घालून उंच कड्यावरुन ढकलून दिल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी माहीती दिली. संशयिताने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधला व त्यांनाही मुलांचे ट्रेनिंग सेंटर पाहण्यासाठी सातार्याला बोलावून घेतले. तेथून त्यांना दिवदेव मार्ली घाटात नेवून प्रथम त्यांन गुंगीचे औषध देत त्यांचाही या संशयिताने खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधिक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी
अजित टिके, मेढा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून तपासासाठी सहकार्यांना सुचना केल्या कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चामे, संजय शिर्के, डी. डी. शिंदे अधिक तपास करत आहेत. मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम भर पावसात महाबळेश्वर ट्रेकर्स व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स यांनी केले.
कोरोनाचा रोगाचा असाही वापर.
त्या मुलांच्या आई वडीलांना बोलावून तुम्हांला मुलांना बघायला नेतो असे सांगून त्यांना बोलावले त्यानंतर तुम्हांला कोरोना होवू नये म्हणून इंजेक्शन घ्या असे
सांगून त्यांना इंजेक्शन देवून बेशुध्द करून खून केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.