

सांगली : शहरात उद्या नोटबंदी वर्षपूर्ती दिनानिमित्त कॉंग्रेस व भाजपा यांच्यात जोरदार पोस्टर वॉर पेटले आहे. बुधवारी शहरात कॉंग्रेसच्या सरकार विरोधातील आक्रोश मेळाव्याची सांगता होणार असून त्याला प्रत्यूत्तर म्हणून गुरूवारी भाजपचा नोटबंदीचा दिवस भष्ट्राचार विरोधी दिवस म्हणून पाळणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून शहरात दिसेल त्या जागेवर पोस्टर लावण्यात आले असून या युध्दात कॉंग्रेसने मोठी आघाडी मारली आहे. शहरात दोन आमदार असूनही भाजपची पोस्टर तोकडी आहेत.
या पोस्टर वॉरमुळे विधानसभेच्या निवडणुकीसदृश वातावरण पहायला मिळत असून एरव्ही न भेटणारे नेते आता पोस्टरमधून डोकावू लागले आहेत. मुळात कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्या एकेकाळीच्या बालेकिल्ल्यात आणि काही संस्था सोडल्यातर भाजपाने आपला झेंडा फडकविला आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद आणि नगरपालिका या निवडणुकीत भाजपाने या दोन्ही मात्तबर प्रस्थापित पक्षांना मागे टाकले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकतही भाजपाचे वारे गाव गाड्यासह सर्व दुर पोहचले जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकत कमी होत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांची स्थिती सुधारली आहे. शिवसेना व भाजपच्या टोकाच्या भांडणामुळे सध्या मध्यावधी निवडणुकीची चाहूलही जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर निद्रिस्थ झालेली कॉंग्रेस नवे बळ संचारत भाजप विरोधात पेटून उटलेली दिसते. त्याचे प्रतिबिंब शहरात जागोजागी उभारलेल्या भाजप विरोधातील फलकातून उमटू लागले आहे. कॉंग्रेसच्या फलकावर नोटबंदीचे अपयश, जीएसटी विरोधातील असंतोष, महागाई, बेकारी, भाजप सेनेतील भ्रष्टाचारांच्या भानगडींना स्थान दिले आहे. तसेच कॉंग्रेसच्या पोस्टरवर अनेक नेत्यांच्या प्रतिमा आहे. या फलकांमधूनही कॉंग्रेस मधील गटबाजी दिसत आहे. मात्र, गटबाजी असूनही कॉंग्रेसची तयारी जोरदार दिसत आहे. यासाठी कॉंग्रेसचे राष्ट्र, राज्य स्थरावरचे अनेक नेते उद्या मेळाव्याच्या निमित्ताने सांगलीत येत आहेत. जिल्ह्यात फक्त महानगरपालिकेवर कॉंग्रेसची सत्ता बाकी आहे. त्यामुळे शहरात जितके फलक मिळतील तितक्या जागेवर कॉंग्रेस आंदोलनाची जाहिरात केली आहे.
दुसऱ्या बाजुला भाजपानेही सत्तेची सुस्ती झटकत नोटबंदीच्या क्रांतिकारक निर्णयाच्या वर्षपूर्तीसाठी गुरूवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. कॉंग्रेसच्या जाहिरातीत डझनभर नेत्यांच्या प्रतिमा आहेत तर भाजपने पुन्हा एकदा फक्त मोदींचाच चेहरा योजत एकमुखी सरकारचाच संदेश दिला आहे. अर्थात कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपचे फलक किरकोळ आहेत. पालिका क्षेत्रात भाजपाचे दोन आमदार असताना भाजपाचा आवाज येथे दबल्यासारखा आहे. महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असल्याने आणि पालिका निवडुका सहा महिन्यावर असल्याने कॉंग्रेसने मोठी ताकद लावली आहे. येथील नेमीनाथनगर येथे मेळाव्यासाठी भव्य मंडप उभारला आहे.
भाजपने या सर्वांला तोंड देण्यासाठी प्रवक्ते मधु चव्हाण यांना फलंदाजीसाठी पाठविले होते. त्यांनी नोटबंदीने कॉंग्रेसच हैराण असून आक्रोश करत असल्याची टीका केली होती. आता गुरुवारी दुसरे फलंदाज माधव भांडारी यांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सांगलीकरांना निवडणुकीचे रण पेटल्याचा अनुभव येतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.