संजय देरकरांनी बांधले शिवबंधन, जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वणीच्या भेटीवर लवकरच येणार असल्याचे सांगितले. त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी शेतकरी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना व पक्षाचे काम पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही दिले.
Sanjay Derkar at matoshri
Sanjay Derkar at matoshri

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व वणीचे माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी साडेबाराला मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी दिली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची; तर उपाध्यक्षपदी शिवसेनेतर्फे संजय देरकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष कोंगरे व उपाध्यक्ष देरकर हे दोघेही वणी तालुक्याचे असल्याने शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार वणीच्या प्रभावाखाली गेला, अशी चर्चा सुरू झाली होती. तर, यावर काँग्रेसचे चंद्रपूर-आर्णीचे खासदार बाळू धानोरकर यांचा वरचष्मा असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या होत्या. 

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन लवकरच संजय देरकर हे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार आज मुंबईत वर्षा निवासस्थानी संजय देरकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षबळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. महाविकास आघाडीने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. 

यावेळी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर, पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड, हरिहर लिंगनवार, संजय देरकर यांचे समर्थक वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, लतीफ खान, लोकेश्‍वर बोबडे, विठ्ठल बोंडे, सरपंच शिंदोला, राजू लडके, रिझवान खान, प्रीतम बोबडे, सुशील मुथा आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी दिले वणी भेटीचे आश्‍वासन
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वणीच्या भेटीवर लवकरच येणार असल्याचे सांगितले. त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी शेतकरी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना व पक्षाचे काम पोहोचविण्याचे आवाहन केले. पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही दिले.

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू. ग्रामपंचायत निवडणूक, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्ष मजबूत करण्यावर भर दिला जाईल. संघटन मजबूत करून सामाजिक कार्याचा वेग वाढविणार आहे. ग्रामीण जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडविण्याला प्राधान्य राहील.
- संजय देरकर
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com