आर्णी (जि. यवतमाळ) छ तालुक्यातील जवळा येथील शेतकरी संजय खंदार शरद पवार यांच्या भेटीला जवळ्यापासून बारामतीपर्यंत तब्बल ६०० किलोमीटर पायी चालून गेले. त्यांच्या वाढदिवशी भेट घेण्याची खंदार यांची इच्छा होती. पण ती भेट १२ डिसेंबरला बारामतीत न होता काल १५ डिसेंबरला पुणे येथे झाली. पवारांनी आपल्या जगावेगळ्या भक्ताला दीड तास वेळ दिला आणि सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या विठ्ठलाची (शरद पवार) यांच्या भेटीने मी भारावून गेलो आहे. माझे आयुष्य सार्थकी लागल्याची भावना खंदार यांनी व्यक्त केली.
बावन्न वर्षीय शेतकरी संजय राणाप्रताप खंदार 19 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता जवळ्यातून बारामतीसाठी पायी निघाले होते. जवळा ते बारामती असा सहाशे किलो मीटरचा पायी प्रवास करून पवारांनी आजवर केलेल्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचा मानस यामागे होता. तसेच विदर्भातील कापूस पिकाचे यावर्षी गुलाबी बोंडअळीमुळे झालेले नुकसान व परतीच्या पावसाने झालेले सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान, यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या या दुःखाकडे शासनाचे लक्ष पदयात्रेच्या माध्यमातून वेधल्या जावे, असा उद्देशही खंदार यांचा होता.
काल मंगळवारी पुणे येथे तब्बल दीड तास पवारांसोबत होते. त्यांची आस्थेने विचारपूस केली. गावाविषयी, जिल्ह्याविषयी, पीक पाण्याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. बोंडअळीने झालेले विदर्भातील कापसाचे नुकसान खंदार यांनी पवारांना सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील व विदर्भातील अनेक जुन्या आठवणी पवारांनी निवांतपणे यावेळी खंदार यांना सांगितल्या. तसेच शेतकरी पदयात्रा दिंडीच्या आठवणीही त्यांनी ताज्या केल्या. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांच्या भेटीच्या गोष्टी सांगितल्या. पवारांनी खंदार यांच्यासोबत जेवण घेतले. यावेळी प्रवीण गायकवाड, अमोल काटे त्यांच्यासोबत होते.
जवळा ग्रामपंचायतीमध्ये सत्काराने सुरू झालेला पायी प्रवास काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये महासत्काराने थांबला. विशेष म्हणजे काटेवाडीच्या सरपंच पदापासून शरद पवारांची कारकीर्द सुरू झाली होती. शरद पवारांशी भेट घेतल्यानंतर आज संजय खंदार यांचे त्यांच्या गावी जवळा येथे आगमन झाले. परत आल्यानंतरही गावकऱ्यांनी खंदार यांचा सत्कार केला.
शेतकरी भक्ताच्या भेटीला विठ्ठल आले
शरद पवारांना विठ्ठलरूपी मानणारे शेतकरी संजय खंदार जवळा ते बारामती पायी प्रवास करून बारामती 12 डिसेंबरला पोचले. पण वाढदिवशी त्यांची भेट झाली नाही. यावेळी ते मुंबईत होते. खंदारांना मुंबईला नका आणू, मीच पुण्याला खंदाराची भेट घेण्यास येतो, असे पवारांनी सांगितले. राजेद्र पवार यांनी सांगितल्यानुसार काल साहेबांनी पुणेला येऊन शेतकरी संजय खंदार यांची भेट घेतली. भक्ताच्या भेटीला विठ्ठल आल्याची भावना संजय खंदार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.