सातारा : वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली होती. तसेच या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देत निधी मंजूर केला होता. त्यापैकी २५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे कास धरणाचे रखडलेले काम पुन्हा सुरु होणार असून हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला आहे.
सातारा शहरासह कास मार्गावरील १५ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेतला होता.
तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानगी ही शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडले होते.
मात्र शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी वाढीव ५८ कोटी निधी मंजूर करून दिला होता. या वाढीव निधीतील २५ कोटींचा पहिला हप्ता नुकताच सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. कास धरणाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरु होणार आहे. जसजसे काम पुढे जाईल तशी उर्वरित रक्कमही पालिकेला मिळेल आणि हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्णत्वास जाणार आहे.
शाहुपूरी योजनेस १२ कोटी....
शिवेंद्रसिंहराजे यांनी काही वर्षांपुर्वी शाहूपूरी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ३१.३१ कोटी निधी मंजूर करुन घेतला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र वीज वितरण कंपनी, वन विभागचा खर्च यामध्ये धरण्यात आला नव्हता. तसेच उर्वरीत पाईपलाईनचे काम यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. हा निधीही उपलब्ध झाला असून शाहूपुरीच्या पाणीपुरवठा योजनेचेही पुढील काम लवकरच सुरु होणार आहे. या दोन्ही योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.