वडूज/दहिवडी : माणमधील शेळ्यामेंढ्यांचे प्रक्षेत्र हे राज्यातील आदर्श प्रक्षेत्र होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करतानाच शेळ्यामेंढ्यांचे निवासी प्रशिक्षण केंद्र येथे सुरू करावे. त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच वडुज (ता. खटाव) येथील तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी व तालुका लघु पशु चिकित्सालयासाठी पशु वैद्यकीय अधिकारी व अद्ययावत सुविधा देण्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी दिली. Start a residential training center for sheep and goats; Vaduz will provide Rs 5 crore to the sports complex
मंत्री केदार यांनी आज खटाव व माणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सहकारी सूतगिरणीस भेट दिली. त्यानंतर माण तालुक्यातील दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला भेट दिली. तसेच येथील शेळ्यामेंढ्यांच्या बंदिस्त वाड्यांचे, शेततळे यांचे उद्घाटन केले. प्रक्षेत्रावरील पशुधन व शेतीची प्रत्यक्ष फिरून पाहणी केली.
यावेळी मंत्री केदार यांना श्री. देशमुख यांनी तालुका क्रीडा संकुल व तालुका लघु पशु चिकित्सालयाच्या समस्यांबाबत माहिती दिली. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 1998 रोजी येथे राज्यातील पहिले तालुकास्तरीय क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. त्यावेळी देखील मंत्री केदार यांच्याकडे क्रीडा मंत्रिपद होते. त्यावेळी त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. सद्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, कार्यालय, 400 मीटरचा धावणे मार्ग तसेच संरक्षक भिंतीचे काही काम झाले आहे.
उर्वरित कामांसाठी चार ते पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. तसेच क्रीडा संकुलासाठी संरक्षक भिंतीचे काम प्राधान्याने होणे गरजेचे आहे, असे सांगून रणजितसिंह देशमुख म्हणाले, ग्रामीण भागांत तयार होणाऱ्या कुस्तीगिरांसाठी महाराष्ट्र राज्य संयोजित खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा येथील क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागल्यास येथे स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल.
तालुका लघु पशु चिकित्सालय हे तालुक्यातील शेतकऱ्यांना पशुधनावर उपचारासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. याठिकाणी सहायक आयुक्तपद रिक्त आहे. शिवाय काही अद्ययावत सोयी-सुविधा मिळणे गरजेचे असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. त्यावेळी मंत्री केदार यांनी तालुका क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी व तालुका लघु पशु चिकित्सालयासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व अद्ययावत सुविधा देण्याची ग्वाही दिली.
दहिवडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला भेटीवेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भरण्यात अडचणी असल्या, तरी बाह्ययंत्रणेद्वारा या जागा भरून पशुपालकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. तसेच येथील प्रलंबित पशुवैद्यकीय दवाखाने लवकर सुरू करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. व्यवस्थापक डॉ. पांडुरंग येडगे यांनी या प्रक्षेत्राचे नियोजन करून प्रक्षेत्राचा विकास केला आहे. येथील सर्वच पशुधन, पिके व बहरलेले वृक्ष पाहून मंत्री केदार यांनी डॉ. येडगे यांचे कौतुक केले, तसेच या प्रक्षेत्राच्या विकासासाठी मागाल ती मदत तुम्हाला करेन, असे आश्वासन मंत्री केदार यांनी डॉ. येडगे यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.