औरंगाबाद ः अटलबिहारी वाजपेयींची काम करण्याची पद्धत आणि गोरगरीबांबद्दल त्यांना असलेली कणव याचा अनुभव मी १९८६ मध्ये मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात घेतला. वाजपेयीजी तेव्हा राज्यसभेचे खासदार होते. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ते आले आणि त्यांनी थेट रोहयो मजुरांची भेट घेण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. फक्त पत्रकार किंवा अन्य कुणालाही याची माहिती होता कामा नये, अशी ताकीद त्यांनी दिली. त्यानूसार अचानक एका पाझर तलावावर काम सुरू असलेल्या मजुरांची त्यांनी चौकशी केली, धान्य मिळते का असे विचारल्यावर काहींनी ते निकृष्ट असल्याची तक्रार केली. एकाने धावत जाऊन घरून मुठभर धान्य आणले. वाजपेयीजींनी त्याची पुडी बांधली आणि संध्याकाळी पत्रकार परिषदेत ते सगळ्यांना दाखवले. तोपर्यंत प्रशासनाला याची खबर देखील नव्हती, पेपरमध्ये बातम्या आल्यानंतर अधिकारी खडबडून जागे झाले होते, अशी आठवण माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली.
मराठवाड्यात ८६ मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी जळगांवहून औरंगाबादला आले होते. यावेळी त्यांच्या दुष्काळी दौऱ्यात मी सोबत होतो. वाजपेयींनी अचानक रोहयो मजुरांच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. पण कुणालाही न सांगता जायचे आहे, असे सांगत त्यांनी या भेटीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्याच्या सूचना दिल्या. माझ्या मतदारसंघातील नायगांव येथे एका पाझर तलावचे काम सुरू होते. तिथे जाण्याचे ठरले, पण वाजपेयीजींचा गाडी तिथे जाईल असा रस्ता नव्हता. मग तेव्हा आमदार म्हणून मतदारसंघात फिरण्यासाठी आम्हाला पंधरा दिवस शासनाकडून एक जीप पुरवली जायची. त्या जीपमध्ये मी वाजपेयीजींना प्रत्यक्ष रोहयो मजुर काम करत असलेल्या पाझर तलावावर घेऊन गेलो. मला आमदार म्हणून लोक ओळखत होते, तर वाजपेयींना त्यांच्या फोटोवरून मजुरांनी ओळखले.
वाजपेयींनी सगळ्या मजुरांशी हिंदीतून संवाद साधत मजुरी वेळेवर मिळते का? ती पुरेशी आहे का? काम नियमित सुरू असते की मध्येच बंद पडते. तुम्हाला धान्य मिळते का? अशी विचारणा केली. तेव्हा मजुरांनी धान्य मिळते पण ते खराब असल्याची तक्रार केली. गावाजवळच तलावचे काम सुरू असल्याने एका मजुराने घरी जाऊन मुठभरून गहू आणले आणि ते वाजपेयीजींना दाखवले. तेच गहू एका पुडीत बांधून अटलजींनी ते सोबत घेतले. संध्याकाळी पत्रकार परिषद बोलावली आणि त्यात रोहयो मजुरांना कसा निकृष्ट गहू पुरवला जातो हे सांगत तो गहूच पत्रकारांना दाखवला.
दुसऱ्या दिवशी या भेटीच्या आणि निकृष्ट गव्हाच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आल्या. तोपर्यंत प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाजपेयींनी रोहयो मजुरांची भेट घेतली, खराब गहू बघितला याची माहिती देखील नव्हती. बातम्या आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी त्या मजुरांकडील खराब धान्य बदलून दिले. दुसऱ्या दवशी लाडसांवगी येथे आयोजित दुष्काळी परिषदेला देखील अटलजींनी हजेरी लावली. रस्ता अत्यंत खराब असल्याचे ते म्हणाले. तेव्हा गावकऱ्यांच्या वादामुळे रस्त्याचे काम रखडल्याचे मी त्यांना सांगितले. तेव्हा भाषणात त्यांनी याचा उल्लेख करत विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले होते.
शब्दांकन ः जगदीश पानसरे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.