
जळगाव : एकनाथराव खडसे Eknath Khadse यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीचे सदस्य ते थेट राज्याचे अर्थमंत्री, महसुल मंत्री, व राज्याच्या विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल गाठली. पद मिळवत असताना भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, राजकीय जीवनात अनेक चढ उतार पाहिले आहेत. आजही त्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे.
१९८७ मध्ये कोथळी ग्रामपंचायत सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय जीवनात प्रारंभ केला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कार्य करीत असताना त्यावेळच्या एदलाबाद तालुक्यात चांगलाच लढा द्यावा लागला, कारण त्यावेळी काँग्रस पक्षाची पाळेमुळे घट्ट रुजली होती, अशा स्थितीत त्यांनी तालुक्यात पक्ष वाढविला. सन १९८९ मध्ये त्यांना एदलाबाद मधून भाजप तर्फे विधानसभा उमेदवारी देण्यात आली, आणि ते विजयी झाले. त्या त्यानंतर या मतदार संघातून ते दहा वेळा निवडून आले.
१९९५ मध्ये राज्यात प्रथमच आलेल्या युती सरकारमध्ये अर्थमंत्री व पाटबंधारे मंत्री झाले तसेच जळगाव Jalgaon जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आले. त्यांच्या कार्यकाळात राज्यात सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा खोरे व तापी खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. या माध्यमातून सिंचनाची मोठी कामे करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ही सिंचनाची कामे झाली. मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी पक्ष वाढविण्याकडे लक्ष दिले.
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्यात कार्य केले. २००९ मध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली. या काळात त्यांनी आघाडी सरकारला त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्यानी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. २०१४ मध्ये राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना ते पद मिळाले नाही मात्र मंत्री म्हणून त्यांना तब्बल बारा खाती देण्यात आली.
तब्बल दोन वर्षे ते मंत्री होते याच काळात २०१६ मध्ये त्यांच्यावर भ्ष्टाचाराचा आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. येथून त्यांचा राजकीय जीवनात पुन्हा संघर्ष सुरू झाला. मात्र, यात त्यांना पक्षांतर्गत संघर्ष अधिक करावा लागला, त्यांच्या चौकशीसाठी आयोग नियुक्त करण्यात आला. त्यानंतर त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. सन २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप ने त्यांना उमेदवारी नाकारली, त्यांच्या कन्या अँड रोहिणी खडसे याना उमेदवारी दिली. मात्र, त्या पराभूत झाल्या. यानंतर पक्षांतर्गत संघर्ष अधिकच वाढला.
२०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मात्र, यानंतरही त्यांचा संघर्ष सुरूच आहे, त्यांना तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडीची चौकशी सुरू आहे. जावई गिरीश चौधरी यांना ईडी ने अटक केली होती. अद्यापही त्यांची चौकशी सुरूच आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने NCP त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी दिले आहे. त्याच्या मंजुरीची अद्याप प्रतीक्षा आहे. या संकटकाळात ही जिल्हयातील प्रलंबित विकास कामांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
Edited by : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.