पांडुरंग हे तर महाराष्ट्राचं दैवत, कारखान्याला माझे नाव कशासाठी? सुधाकरपंतांनी केला होता विरोध

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे सोमवारी (ता.17) रात्री निधन झाले.
  पांडुरंग हे तर महाराष्ट्राचं दैवत, कारखान्याला माझे नाव कशासाठी? सुधाकरपंतांनी केला होता विरोध
Published on
Updated on

पंढरपूर ः स्वतः एक खासगी साखर कारखाना विकत घेवून त्याचे सहकारीकरण केल्यानंतर स्वतःकडे अध्यक्षपद न घेता ते आपल्या कार्यकर्त्यांकडे सोपवणारे (कै.) सुधाकर परिचारक हे महाराष्ट्रातील पहिले राजकारणी होते, अशी प्रतिक्रिया पांडुरंग साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरभाऊ मोरे यांनी आज व्यक्त केली. 

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे सोमवारी (ता.17) रात्री निधन झाले. त्यानंतर आज सकाळी विविध संस्थांच्या वतीने सुधाकर परिचारक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात बोलताना मोरे यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. मोरे म्हणाले की, पंढरपूर तालुक्‍यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाल्यानंतर सुधाकर परिचारकांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उस वेळेवर गाळपास जावा, त्यातून त्यांना अधिकचे चार पैसे मिळावेत,

शिवाय तालुक्‍यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने 1988 साली श्रीपूर (ता.माळशिरस) येथील आगाशे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना विकत घेवून त्याचे 1992 साली सहकारीकरण केले. 

अवघ्या काही वर्षातच तोट्यातील हा साखर कारखाना त्यांनी नफ्यात आणला. स्वतः पुढाकार घेवून आणि शेतकर्यांकडून पैसे गोळाकरुन त्यांनी अत्यंत कष्टाने हा कारखाना सुरु केला. सुरवातीला त्यांना स्वतःकडे अध्यक्षपद घेता आले असते,परंतु त्यांनी सत्तेची कोणतीही लालसा न दाखवता, माजी आमदार (कै.) तात्यासाहेब डिंगरे यांना कारखान्याच्या पहिल्या अध्यक्षपदाची संधी दिली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शामराव परिचारक हे काही दिवस कारखान्याचे अध्यक्ष होते. 

शेतकऱ्यांच्या शेतात पिकवल्या जाणाऱ्या ऊसावर साखर कारखाना चालतो, हे माहिती असलेल्या परिचारकांनी शेतकरी पुत्र असलेले चळे (ता.पंढरपूर) येथील (कै.) भास्करआप्पा गायकवाड यांना कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी दिली. (कै.) गायकवाड यांनी अनेक वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर गादेगाव (ता.पंढरपूर) (कै.) रामभाऊ बागल यांच्याकडे कारखान्याची धूरा सोपवली. (कै.) बागल यांनी ही कारखान्याच्या अध्यक्षपदाची अनेक वर्षे धुरा सांभाळली.

त्यांच्या नंतर मी अनेक वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुधाकर परिचारक यांनी कधी हस्तक्षेप केला नाही किंवा नेते पदाचा आव दाखवला नाही. शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या कल्याणासाठी जे काही चांगले करता येईल ते करा असे ते नेहमी सल्ला देत असत. 

कारखान्याची यशस्वी घौडदौड सुरु झाल्यानंतर माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना कारखान्याचे अध्यक्षपद घ्यावे अशी विनंती केली होती. तरीही त्यांनी नाकारली होती. अखेर 2015 कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर त्यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

गेली पाच वर्षे त्यांनी समर्थपणे कारखान्याची धुरा सांभाळी आहे. त्यांच्या  जाणण्याने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व आणि सच्चा राजकीय नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. 

यावेळी बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे, पांडुरंग साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख, पंडीत भोसले, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष घोडके, तानाजी वाघमोडे, दाजी पाटील, हरिश्‍चंद्र गायकवाड, संचालक कैलास खुळे, बाळासाहेब यलमर, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. 

नाव बदलण्यास विरोध 
सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेला पांडुरंग साखर कारखान्याचे नाव बदलून सुधाकरपंत परिचारक असे नामकरण करण्याचा मनोदय काही वर्षापूर्वी कारखान्याच्या सर्वच संचालकांनी व्यक्त केला होता. तेव्हा पांडुरंग हे राज्याचे आणि लाखो भाविक भक्तांचे दैवत आहे. त्या दैवता पेक्षा मी कोणीही मोठा नाही. त्यामुळे पांडुरंग हेच नाव कायम राहिल असे सांगत त्यांनी कारखान्याच्या नामकारणास विरोध केला अशी आठवण दिनकर मोरे यांनी सांगितले 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com