
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'तून भाजप व नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी भाषेबद्दल त्यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
पत्रात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, "रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो. मला खात्री आहे की, त्यांनासुद्धा ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील, अशी मी आशा बाळगतो.'
सामनामधून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका केली जात आहे, अशी तक्रार करत आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी पत्र लिहिले आहे.
चंद्रकांतदादांनी पत्रात म्हटले आहे की, "नमस्कार, रश्मी वहिनी, आज आपणास पत्र लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सामना वृत्तपत्रामधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तरातील भाषा.''
"वहिनी या पत्राद्वारे आपल्याला मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा, या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपल्याला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की, आपणालाही ही भाषा आवडत नसेल,'' असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, ""आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करू इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.''
दरम्यान, चंद्रकांतदादांनी त्यांचा ट्विटमध्ये सामना ऑनलाइन, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टॅग करून त्यांचेही लक्ष या पत्राकडे वेधले आहे.
चंद्रकांत पाटील हे संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत, असा प्रश्न दुपारी पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी खिल्ली उडवत, "आता मला भीती वाटू लागली आहे,'' अशा शब्दांत टोला लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.