अटकेनंतर प्रथमच पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांचा नारायण राणेंना फोन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (ता. २७) रत्नागिरीतून सुरू होईल.
Narendra Modi, Amit Shah called to Narayan Rane
Narendra Modi, Amit Shah called to Narayan Rane

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दूरध्वनी करून घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Narendra Modi, Amit Shah called to Narayan Rane) 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (ता. २७) रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील, असेही जठार यांनी रत्नागिरीमधील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये; म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल व्हिडिओतून पाहिले. याची दखल पीएमओने घेतली असून या व्हिडिओ आणि शिवसेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. 

जठार म्हणाले की, केंद्रीय मंत्री म्हणून कोणत्याही प्रोटोकॉलचे पालन न करता पोलिसांनी अतिरेक्यांप्रमाणे वागणूक दिली. एसपी, पोलिस शिवसेना शाखाप्रमुखाप्रमाणे वागत होते. रस्त्यावरची पोस्टर्स पोलिस बंदोबस्तात फाडली जात होती. आम्ही अटकेला घाबरत नव्हतो. शिवसेनेने अटक करावी, हे चॅलेंज दिले होते. 

नारायण राणे खोलीत जेवताना पोलिसांनी मेगाफोन लावून इशारा दिला. राणे औषध घेत होते, प्रोटोकॉल पाळा, मी यात्रेचा संयोजक आहे, माझ्याकडे नोटिस, वॉरंट द्या, मी सही घेऊन देतो, असे मी सांगत होतो. अटक करण्याच्या प्रक्रियेला आमचा विरोध नव्हता. रायगडचे जिल्ह्याचे एसपी उपस्थित होते, त्यांच्याकडे ताब्यात घेण्याचे कागदही होते. परंतु शेवटपर्यंत त्यांनी दिले नाहीत. संगमेश्वर पोलिस चौकीबाहेर राणेंना दीड तास गाडीत बसवून ठेवले. तिथे आम्ही ठिय्या आंदोलन केले. रायगड पोलिसांच्या ताब्यात आहोत, हे बातमीवरून आम्हाला कळले. डीवायएसपींनी सांगितल्यावर एक तासाने एसपी बाहेर आले व म्हणाले मी दुसऱ्या महत्त्वाच्या कामात होतो, असा आरोपही जठार यांनी केला. 

पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.
 
त्यांच्यापैकीच कोणीतरी माईक चालू ठेवला असावा

अनिल परब यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ जगाने पाहिला. परबांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्यांपैकी कोणी घात केला, हे शोधून काढले पाहिजे. कारण स्थानिक आमदार, मंत्री असूनही त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले आहे व दुसऱ्याला मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांना ते पालकमंत्रीपद हवे असावे. त्यांच्यापैकीच कोणीतरी माईक चालू ठेवला असावा. आम्ही परबांचा जाहीर निषेध करतो. १०० कोटींचा मलिदा जमवणाऱ्या या मंत्र्याने मुद्दाम डीपीडीसीची बैठक लावली खरी पण तेच या खड्ड्यात पडले आहेत, असा टोला जठार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com