`महाराष्ट्रात निवडणूक झाल्यास फडणवीसच भाजपचा चेहरा!`

दिल्लीत येण्यास तयार नव्हतो, या गडकरींच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्याची प्रतिक्रिया..
devendra fadnavis
devendra fadnavis

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाल्यास भाजप देवेंद्र पडणवीस यांचे नेतृत्व व त्यांचाच चेहरा तसेच संघटनात्मक ताकद यांच्याच जोरावर त्या लढवेल असे स्पष्ट करून भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने विरोधी पक्षनेते  फडणवीस यांच्या दिल्लीतील कथित बदलीच्या वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी निवडणुकांमध्ये राज्यात कोणाशी युती करायची हा विषयच भाजपसमोर सध्या नाही असेही या अमराठी नेत्याने  अनौपचारीक गप्पांमध्ये स्पष्ट   केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, आपल्याला जबरदस्तीने दिल्लीत पाठविण्यात आले, असा सूर पुन्हा आळविला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची दिल्लीत बदली होईल, अशीही चर्चा आहे. मात्र भाजपने या नेत्याला मराठी पत्रकारांशी बोलण्यासाठी पाठवून याबाबतच्या चर्चांना तूर्त विराम दिला व दिल्लीत येण्यास ते अजिबात तयार नाही, हे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला पटवून देण्यात फडणवीस यांना पुन्हा यश आल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले.

या नेत्याच्या म्हणण्यानुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना राज्यातील संघटन निवडणुकीच्या दृष्टीने आणखी मजबूत करण्याची सूचना केली आहे. साहजिकच ते तूर्त महाराष्ट्राचीच जबाबदारी सांभाळणार आहेत. या नेत्याने सांगितले की राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांतील बेबनाव भाजप जनतेसमोर मांडेल.  राज्यातील जनतेने सध्याच्या सरकारचे काम पाहिल्याने आगामी निवडणुकीत भाजपचे मजबूत संघटन व फडणवीस यांचे निर्णयक्षम, खंबीर नेतृत्व यांना महाराष्ट्रातील जनता निश्चित कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ पातळीपासून मजबुती देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या भगिनी व भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज आहेत, त्याबद्दल विचारले असता या नेत्याने, पंकजाजी यांना  राष्ट्रीय सरचिटणीस केले आहेच ना, असा प्रतिप्रश्न विचारला. पंकजा या भाजपच्या शिवाय अन्य कोणताही विचार करू शकत नाहीत व त्यांच्या मनातही पक्षांतराचा विचार नाही असे सांगून या नेत्याने मुंडे भगिनींचीही 'मन की बात' पत्रकारांना सांगितली. 

चंद्रकांतदादांचा दिल्ली दौरा 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आॅगस्टच्या दुसऱया आठवड्यात दिल्लीत येत असून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मराठी केंद्रीय मंत्री, सत्तारूढ खासदार, महाराष्ट्रातील राष्ट्रीय पदाधिकारी व अर्थातच गृहमंत्री अमित शहा यांच्या गाठीभेटीचे व बैठकांचे भरगच्च कार्यक्रम त्यांनी आखले आहेत. संसद अधिवेशन चालू असताना भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोालवून घेणे याचा काहीही वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट करून हे नेते म्हणाले की  अनेक राज्यांतील भाजप मुख्यमंत्री,  प्रदेशाध्यक्ष व संघटनमंत्री  अधिवेशनाच्या काळात दिल्लीत येत असतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com