पुणे : महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला कमी केल्याने महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज (ता. १५ जानेवारी) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. ते म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी आम्हाला जमिनीचे भाव करण्यासंदर्भात सूचना केली होती. मोबदल्याचा दर कमी केला नसता तर राज्यातील एकही प्रकल्प पूर्ण झाला नसता, असा दावाही पवार यांनी या वेळी केला. (Ajit Pawar gave an explanation about decision to reduce the price of land)
उपमुख्यमंत्री पवार शनिवारी (ता. १५ जानेवारी) पुण्यात बोलत होते. त्यावेळी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले ते म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मागील काळात म्हणाले होते की, आम्ही जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रस्ते बनवतो. महाराष्ट्रातील भूसंपादनाचा दर आणि महाराष्ट्राबाहेरील दर याच्यात फरक असल्याचे सांगितले होते. त्याबाबतची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली होती. त्या बैठकीत त्यांनी सांगितले होते की तुम्हाला देशातील इतर राज्यांच्या बरोबरीने नियमावली करता आली तरच महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे होतील.
देशपातळीवर निर्णय घेताना एका राज्यात जमिनीचा दर जास्तीचा द्यायचा आणि लगेच शेजारचे कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या आपल्या शेजारील राज्यांत जमिनीचा दर दुसरा द्यायचा, असं आपल्याला करून चालणार नाही. जमिनीच्या दराबाबत तुम्हाला बारकाईने विचार करावा लागेल, असे गडकरी यांनी आम्हाला बजावून सांगितले होते. त्यासंदर्भात आम्ही ठरवलं की, आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग व्हायचे असतील, तर देशपातळीवर इतर राज्यांच्या बरोबरीने आपण जमीन मालकाला दर द्यावा, असे ठरले आहे. जमिनीचा दर कमी करण्यामागचे हे कारण आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले की, राज्य सरकारने संपादीत होणाऱ्या जमिनीचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला नसता तर आपला एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता. या प्रश्नासंदर्भात मधल्या काळात बरेच दिवस चर्चा सुरू होती. मध्यंतरी गडकरी भेटले, तेव्हा ते म्हणाले की, हे मी तुम्हाला शेवटचे सांगतो आहे, जमिनीच्या दरामध्ये बदल झाला तर ठीक. नाही बदल झाला तर शेवटी तुमचा निर्णय तुमच्याबरोबर, असे त्यांनी आम्हाला बजावून सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.