बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनोव्हेशन सेंटरच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. प्रास्ताविकात वेगवेगळ्या विषयासंदर्भात मागण्या करणारे आपले मोठे बंधू राजेंद्र पवार यांनाही त्यांनी आपल्या खास शैलीत चिमटे काढले. (Ajit Pawar took note of the demands made by Rajendra Pawar)
प्रास्ताविक बोलताना संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी संस्थेपुढे येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. कृषी खासगी विद्यापीठास मान्यता द्यावी, खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी द्यावी, अनेक चुकीचे निर्णय बदलण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली. लालफितीचा कारभारही कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर बोलायला उठलेल्या अजित पवारांनी नेहमीप्रमाणे राजेंद्र पवार यांच्या भाषणावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री म्हणाले की, आज आमच्या बंधूंची गाडी जोरात होती. समोर साहेब, मी, मुख्यमंत्री, सुप्रिया बसले आहेत. पण बाबा काही केल्या थांबायलाच तयार नव्हता. मी म्हटलं कामं करून घ्यायची असतील तर त्याला पार उभं, आडवं करून कशी कामं होणार? काम थोडं गोड बोलून, थोडंसं गोंजारून, एखादा चिमटा काढून करायची असतात. पण, ते सारखं इकडे चिमटे, तिकडे चिमटे काढत होते. काय झालंय आज. पण जाऊद्या आता जास्त काही बोलत नाही. कारण, दिवाळीचा सण आहे, ते आमचे मोठे बंधू पडतात. पण, जी काही नोंद घ्यायची आहे, ते घेतली आहे बंधूराज, असे हात जोडून म्हणताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. जेवढे करता येईल, तेवढे आम्ही सर्व जण नक्की करण्याचा प्रयत्न करू. कारण, मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक निर्णय घेत असतात, असा विश्वास आमच्या बंधूराजांना देतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या कार्यक्रमाला येण्यासाठी अडचण होती. पण आम्ही फारच आग्रह धरला, त्यानंतर ते बारामतीत आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. शिक्षणाच्या क्षेत्रात बदल झाल्यानंतर अनेक वंचित समाजातील मुलं दर्जेदार शिक्षण घेत आहेत. समाजातील सर्व घटकांसाठी शिक्षण देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आहे. ही दोन्ही सेंटर उभी करत असताना अनेक अडचणी आल्या. त्याचा उल्लेख आमचे बंधू राजेंद्र पवार यांनी केला आहे. पण अनेक जणांनी या सेंटरसाठी योगदान दिले, कष्ट घेतले आणि वेळ दिला आहे, त्यामुळे ही सेंटर उभी राहू शकली आहेत. पण ज्या उद्देशाने हे सेंटर उभे राहिले आहे, तो सफल झाला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणत होते की अशी सेंटर इतर ठिकाणीही उभारली पाहिजेत, असा प्रयत्न झाला पाहिजे, असे ते मला म्हणत होते.
या दोन्ही सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याबाबत आवड निर्माण करू शकलो. आणि आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या गोष्टी अशा का घडल्या. या नजरेतून पाहण्याची सवय निर्माण करू शकलो तर मोठे यश राहणार आहे. ही दोन्ही सेंटर मोठी भूमिका बजावतील, असा मला विश्वास आहे. राजकीय विचारधारा कोणतीही असली तर राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर मान्यवर लोकांना बारामतीत पवार साहेबांनी आणलं आहे. त्यांच्याकडून आपल्याकाही चांगल्या गोष्टी शिकता आल्या आहेत. आज मुख्यमंत्री ठाकरे आले आहेत. ते नेहमी आपल्याला सहकार्य करत असतात. पण, कोरोनाारख्या संकटावर मात करून राज्याला पुढे नेण्याचे काम ठाकरे यांच्या नेतृत्वात होत आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.