
delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाला अस्मान दाखवले आहे. भाजपच्या या लाटेत आपसोबतच काँग्रेसचा देखील सुफडासाफ झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सर्वसामान्य मतदारांनी आम आदमी पार्टीला पराभूत केले. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्यासोबतच अन्य चार राज्यातदेखील काँग्रेसची पाटी कोरीच राहिली आहे. देशातील दोन बड्या व तीन छोट्या राज्यात काँग्रेसचा एक देखील आमदार नाही. त्यामुळे येत्या काळात या सर्वच राज्यात काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
काँग्रेसचा (Congress) दिल्लीत सुपडासाफ होण्याची ही पहिली वेळ नाही या पूर्वी दोन वेळा भोपळा फोडता आलेला नाही. दुसरीकडे देशातील आणखी चार राज्यात काँग्रेस शून्यावर आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, सारख्या मोठ्या राज्यांचा देखील समावेश आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सर्वसामान्य मतदारांनी आम आदमी पार्टीला सपशेल पराभव करीत भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे.
तिसऱ्यांदा काँग्रेसच्या जागात कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि नागालँड या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला या राज्यात पक्ष वाढीवर लक्ष द्यावे लागणार आहे. काही राज्यात प्रादेशिक पक्ष वरचढ ठरत असताना काँग्रेसला मिळत असलेले अपयश आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची पाटी कोरीच
पश्चिम बंगाल विधानसभेत 294 जागा आहेत. 2021 च्या मे महिन्यात येथे निवडणूका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला प्रथमच पश्चिम बंगालमध्ये मोठा पराभव सहन करावा लागला आहे. पहिल्यांदाच काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत. बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचे सरकार असून पक्षाचे 224 आमदार निवडून आले होते. तर विरोधी पक्ष भाजपकडे 66 आमदारांचे बळ आहे.
आंध्र विधानसभेत काँग्रेस शून्यावरच
आंध्र प्रदेशात आठ महिण्यापुर्वीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळेल, असे चित्र होते. परंतू, काँग्रेसला एक देखील जागा जिंकता आली नाही. पक्षाचे बहुतांशी आमदार तिसऱ्या क्रमांकावर ढकलेले गेले. किंवा डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. आंध्रप्रदेशात एनडीएचे 164 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष वायएसआरचे 11 आमदार आहेत.
नागालँड काँग्रेसच्या नावावर भोपळा
नागालँड विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. येथे फेब्रुवारी 2023 मध्ये विधानसभेची निवडणूका झाल्या होत्या. काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला नाही. नागालँड येथे एनडीपीपी या पक्षाकडे 25, भाजपाकडे (BJP) 12, एनसीपीकडे 7, एनपीपीकडे 5, एलजेपी ( आर ) कडे 2, आरपीआयकडे 2आमदार आहेत. एनपीएच्या जवळ नागालँडमध्ये 2 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे नागालँड येथे सर्व पक्ष सरकारमध्ये सामील आहेत. येथे कोणताही विरोधी पक्ष नाही.
सिक्कीमधील सर्व जागा एनडीएकडे
सिक्किम विधानसभेच्या एकूण 32 जागा आहेत. एकेकाळी सिक्कीम हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतू आता काँग्रेसकडे एक आमदार नाही. सिक्कीममध्ये काँग्रेस शून्यावर पोंहचली आहे. सिक्कीमच्या सर्व 32 जागांवर सिक्किम क्रांतिकारी मोर्चा यांचा ताबा आहे. एसकेएम येथे भाजपाच्या सोबत एनडीएसोबत आहे.
तीन राज्यांत काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार
अरुणाचल विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. या ठिकाणी एनडीएने 59 जागा मिळवल्या आहेत. अरुणाचल येथे काँग्रेसचा केवळ एक आमदार आहे. याच प्रकारे मेघालय आणि मिझोरममध्ये देखील काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. याच प्रकारे मणिपूर आणि पुडुचेरी राज्यात काँग्रेसकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. पुडुचेरीत अलिकडेपर्यंत काँग्रेसचे राज्य होते. मणिपूरमध्ये देखील काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता. मात्र, गेल्या काही दिवसापासून चित्र बदलत आहे. प्रत्येक राज्यात काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.