Kadu On Ambedkar : बच्चू कडू 'बॅट'नं 'फोर-सिक्स' मारणार अन् आंबेडकरांची 'खिचडी' 'गॅस सिलिंडर'वर शिजणार?

Assembly Election 2024 : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही पक्षांची चिन्हं बदलली आहेत. कडू यांच्या हाती 'बॅट' आलीये तर आंबेडकरांच्या घरात 'गॅस सिलिंडर' आलाय.
prakash ambedkar bacchu kadu
prakash ambedkar bacchu kadu sarkarnama
Published on
Updated on

लोकसभेला बच्चू कडू यांची प्रहार 'शिट्टी'वर लढली. मात्र, त्यांच्या उमेदवाराची 'शिट्टी' काही वाजली नाही. त्यांनी विरोधकांच्या डोक्यात मात्र 'शिट्ट्या' वाजवल्या. प्रकाश आंबेडकर यांची वंचित 'प्रेशर कुकर'वर लढली. पण, त्यात त्यांच्या मतांची डाळ काही शिजली नाही.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर, या दोन्ही पक्षांची चिन्हं बदलली आहेत. कडू यांच्या हाती 'बॅट' आलीये तर आंबेडकरांच्या घरात 'गॅस सिलिंडर' आलं आहे. त्यामुळं येत्या विधानसभेला तरी कडूंची 'बॅटिंग' आणि आंबेडकरांचं 'कुकिंग' पाहायला मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कडू फोर-सिक्स मारणार की एक-दोन धावा काढणार?

बच्चू कडू ( Bacchu Kadu )... प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष... 1999 ला विधानसभेला तर 2004 मध्ये अमरावती लोकसभेला पराभव... मात्र त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे सलग चौथ्यांदा आमदार! उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राहिलेले राज्यमंत्री! 2024 ला अमरावती लोकसभेत दिनेश बूब यांना उतरवलं आणि भाजपच्या नवनीत राणांना सांगून पाडलं. दिनेश बूब यांनी नाही म्हटलं तरी 85 हजार मतं घेतली आणि 'हवा' केली. बच्चू कडूंच्या 'प्रहार'ची लोकसभेत 'शिट्टी' वाजली नाही हे पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हाती 'बॅट' आलीये.

अमरावती जिल्ह्यात वडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर असे 06 विधानसभा मतदारसंघ येतात. यंदा बच्चू कडू फोर-सिक्स मारणार की एक-दोन धावा काढून आपला 2019 चा स्कोअर कायम राखणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मेळघाट आणि अचलपूरवर 'प्रहार'चा ताबा आहे. बसप, भाजप, राष्ट्रवादी असा प्रवास करून 1999 आणि 2004 असे सलग दोन वेळा भाजपचे आमदार राहिलेल्या राजकुमार पटेलांनी 2019 मध्ये 'प्रहार'कडून निवडणूक लढवत भाजपवरच 'प्रहार' केला आणि बच्चू कडूंना मेळघाट जिंकून दिला होता.

prakash ambedkar bacchu kadu
Maharashtra Politics : आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ठाकरे, पटोलेंच्या पोटातलं ओठावर; पवारांच्या मनात काय...

कडू-पवार भेट ही 'मविआ' प्रवेशाची चाहूल की हूल?

लोकसभेचं बिगुल वाजत नाही, तोच कडूंनी महायुतीवर प्रहार करायला सुरुवात केली. आपल्याच घटक पक्षाच्या उमेदवार म्हणजे भाजपच्या नवनीत राणांविरुद्ध आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून काँग्रेसचा उमेदवार जिंकून आणला. पक्षाचा 'लॉस' झाला, पण राणांना त्रास झाला, याचं समाधान पदरात पाडून घेतलं. आता तर ते थेट महायुतीतून बाहेर पडण्याची भाषा करू लागलेत. शरद पवारांची त्यांनी घेतलेली भेट ही महाविकास आघाडीतील त्यांच्या प्रवेशाची 'चाहूल' समजायची की 'हूल' हे समजायच्या आतच चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या तोंडातील नाराजीचा 'कडू' घास काढण्यासाठी थेट 'पूर्णामाय' गाठली आणि त्यांच्यासोबत गोड घास खात-खात तूर्तास तरी कडूंच्या महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना अल्पविराम दिला.

कडू आणि त्यांचे प्लेअर कोणत्या संघाकडून खेळणार?

विधानसभेचा राज्यस्तरीय 'कप' जिंकण्यासाठी 'मविआ' आणि 'महायुती' या दोन संघांत अंतिम सामना होणार हे निश्चित आहे. या सामन्यात बच्चू कडू आणि त्यांचे प्लेअर कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत मात्र कमालीचं औत्सुक्य आहे. 145 ची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी कडूंसह त्यांच्या प्लेअर्सना आपल्या संघाकडून खेळवण्यास हे दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे नक्की! अर्थात, हाती बॅट आलेले कडू हा सामना कसा फिरवतात यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असणार!

आंबेडकर पुन्हा 'एकला चलो'च्या भूमिकेत?

प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar )... वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष! 1984 पासून 2024 अखेर सलग अकराव्यांदा अकोला लोकसभा लढवणारा लढवय्या नेता! 1998 ला रिपाइं आणि 1999 ला 'भारिप'कडून असे मिळून दोनदा खासदार! 2019 ला वंचितची स्थापना करून त्या वर्षीच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम फोडलेल्या आंबेडकरांना 2024 च्या लोकसभेत आपला 'परफॉर्मन्स' राखता आला नाही.

त्यांनी आपल्या उमेदवारांपैकी कुणाला 'प्रेशर कुकर', कुणाला 'गॅस सिलिंडर' तर कुणाला 'रोड रोलर'वर लढवलं खरं पण विरोधकांवर ना कुठलं 'प्रेशर' आलं, ना कुणी 'गॅस'वर राहिलं ना कुणी 'रोड रोलर' खाली सापडलं! वेळोवेळी 'एकला चलो' च्या भूमिकेत दिसणारे आंबेडकर निदान आता तरी कुणाशी जुळवून घेणार का हाच खरा प्रश्न आहे.

prakash ambedkar bacchu kadu
Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांचे विधान; रोहित पवारांची शक्यता खरी ठरणार; विधानसभेलाही पवार VS पवार सामना रंगणार?

आंबेडकर 'सिलिंडर'वर विधानसभेची खिचडी शिजवणार?

2019 च्या लोकसभेत भल्या-भल्यांना 'सळो की पळो' करून सोडलेल्या वंचितला 2024 ला आपला दरारा टिकवता आला नाही. 38 जागा लढूनही भोपळा फोडता आला नाही. आता मात्र वंचितच्या घरात 'गॅस सिलिंडर'चं कनेक्शन अधिकृतरित्या बसवलं गेल्यानं विधानसभेला एकाच वेळी अनेक उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकेल. त्यामुळं आता या 'गॅस'वर प्रकाश आंबेडकर आपली विधानसभेची 'खिचडी' शिजवणार का हे पाहावं लागेल.

एकूणच काय तर आगामी विधानसभेला बच्चू कडू कशी 'बॅटिंग' करतात आणि प्रकाश आंबेडकर कशी 'कुकिंग' करतात याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com