‘हर्षवर्धन पाटीलसाहेब, तुमचा त्रास कमी झाला का..? नसेल तर आपल्याकडील पान्याने टाईट करू’
इंदापूर : इंदापूर (Indapur) येथील कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना उद्देशून आमदार राम शिंदे (Ram shinde) म्हणाले, ‘मला त्रास होतो. मात्र, त्याची भीती कमी झाली आहे. तुमचा त्रास कमी झाला आहे का? नसेल झाला तर आपण आपल्याकडील पान्याने टाईट करू,’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Harshvardhan Patilsaheb, has your problem subsided? : Ram Shinde)
भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला आहे. या मतदारसंघाच्या प्रभारीपदी माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ सप्टेंबरपासून तीन दिवस मतदारसंघात असणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री शिंदे यांनी इंदापूरमध्ये बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले.
राम शिंदे म्हणाले की, दिवस बदलतात, पावसाळा झाला की हिवाळा येतो. आपल्याला एवढे दिवस उन्हाळा होता, आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन पाटील हे २०१९ पूर्वी काँग्रेस पक्षात होते. मागील २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पराभव झाला हेाता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बारामतीकरांचा त्रास आपण किती दिवस सहन करायचा, असा सवाल करत त्यांनी भाजपची वाट धरली होती.
काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे आपल्याला निवांत झोप लागते, असे विधान केले होते. त्या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा त्रास कमी करण्यासाठी पान्याने टाईट करण्याची भाषा केली आहे. आता तो पान्हा कोणता आणि कोणाच्या विरोधात तो वापरण्यात येणार, याची चर्चा इंदापुरात रंगली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.