Vaibhav Naik : राणेंना कुडाळ-मालवणमधून मिळालेलं मताधिक्य नाईकांसाठी धोक्याची घंटा

Narayan Rane VS Vinayak Raut : विनायक राऊत यांचा पराभव आणि राणेंच्या विजयानं कोकणात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आहे.
narayan rane vaibhav naik
narayan rane vaibhav naiksarkaranama

- प्रशांत हिंदळेकर

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ( Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election ) केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात 'हाय व्होल्टेज' लढत झाली. या लढतीत अखेर भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली.

राणे यांच्या रूपानं कोकणात प्रथमच भाजपचं कमळ फुललं आहे. त्याच्या विजयात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मेहनत फळास आल्याचं दिसून आलं. विनायक राऊत यांचा पराभव पाहता येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार वैभव नाईक ( Vaibhav Naik ) यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

येत्या काळात भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तर दुसरीकडे ठाकरे गटातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकसभेची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीचे तथा ठाकरे गटाचे विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांची उमेदवारी जाहीर झाली. येथून मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण, भाजप आणि शिंदे गटाच्या वादात जागा वाटपाचा तिढा उशिरापर्यंत सुटलेला नव्हता. अखेर नारायण राणे ( narayan Rane ) यांची उमेदवारी भाजपचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आली.

ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत विनायक राऊत यांच्या मतदारसंघातील प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचेही दिसून आले; पण त्यांच्या विरोधात नारायण राणे यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ होणार, हे जवळपास निश्चितच होते. भाजप महायुतीतर्फे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला. त्यानुसार जुने, नव्या पदाधिकाऱ्यांसह, महिला, युवा वर्ग त्यांच्या प्रचारासाठी शहरातील वाड्यावाड्यांत, गावातील प्रत्येक वाडीत उतरल्याचे दिसून आले.

narayan rane vaibhav naik
Ratnagiri-Sindhudurg Constituency: दीपक केसरकरांची मैत्री राणेंना विजयापर्यंत घेऊन गेली

2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्य पराभवाची परतफेड करण्याचा निर्धार राणेंच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानुसार गावागावांमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. भाजपसह महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ राणेंच्या विजयानं मिळालं आहे.

विनायक राऊत हे तिसऱ्यांदा निवडणुकीस सामोरे गेले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर याआधी शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. यावेळेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळेल, असा विश्वास विनायक राऊत यांना होता. त्यादृष्टीनं राऊतांनी जिल्ह्यात प्रभावी यंत्रणाही राबविली. मतमोजणीच्या दिवशी निकालाकडे पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघात राऊत यांना चांगलं मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी मतदारसंघात राऊतांची जास्त मदार होती. पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राणे यांना मोठं मताधिक्य मिळाल्यानं राऊत यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि राऊत यांच्या विजयाची हॅटट्रीक रोखली गेली. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, येथे वैभव नाईक हे आमदार आहेत. त्यामुळे राऊत यांना मोठं मताधिक्य मिळणं गरजेचं होतं. मात्र, मतमोजणीचा निकाल पाहता कुडाळ-मालवणमधून राणेंना 79 हजार 513 मते, तर राऊत यांना 53 हजार 277 मते मिळाल्याचं दिसून आलं.

कुडाळ-मालवण मतदारसंघातून राणे यांना मिळालेलं मताधिक्य पाहता येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com