हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. त्यांनी 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.सोमवारी (ता.23)सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या अनेक दिवसापासून बेनेगल हे आजारी होते.श्याम बेनेगल यांनी चरणदास चोर, भूमिका,जुनून, कलयुग ,मंडी , त्रिकाल, द मेकिंग ऑफ महात्मा, जुबेदा,नेताजी सुभाषचंद्र बोस, वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा दिग्दर्शित केले होते.भारत सरकारने बेनेगल यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 पद्मभूषण पुरस्कार गौरव केला होता.त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बॅनर वॉर सुरु झाले आहे. आज सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचे तर संध्याकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भावी पालक मंत्री म्हणून आदिती तटकरे यांचे बॅनर लावले आहेत. गोगावले यांच्या बॅनरवर फिक्स पालक मंत्री तर आदिती यांच्या बॅनरवर भावी पालकमंत्री , अशा शब्दांच्या चढाओढ दिसून येत आहेत. यामुळे आता रश्शीखेच नाही, वाद नाही अस सांगितल जात असल तरी महायुतीत रायगडच्या पालकमंत्रिपदावरून जुंपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
राहुल गांधी यांनी परभणी येत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर गंभीर आरोप केले. यावर महाराष्ट्रातील राजकारण तापू लागले असून, महायुतीमधील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात राहुल गांधी यांच्यावर टीका करू लागले आहेत. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "राहुल गांधी यांना महाराष्ट्र कुठे कळलाय. राहुल गांधी यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं".
राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर येत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोमनाथ यांची पोलिसांनी हत्या केली. यावर मुख्यमंत्री विधिमंडळात खोटे बोललं आहे, असा गंभीर आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले, "राहुल गांधी परभणीत फक्त राजकीय हेतूनं आले. केवळ द्वेष निर्माण करणे हाच राहुल गांधींचा हेतू आहे. सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्यात सगळं सत्य बाहेर येईल. या चौकशीत मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल".
सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी परभणी येत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. राहुल गांधी यांनी या कुटुंबियांशी जवळपास अर्धातास चर्चा केली. चर्चा करताना राहुल गांधी यांना सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी उत्तरीय तपासणीचा अहवाल, व्हिडिओ आणि छायाचित्र दाखवले. यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली. मुख्यमंत्री सभागृहात खोटं बोलत आहेत. दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली आहे. याला 'आरएसएस'ची विचारधारा जबाबदार असून, इथं कोणतेही राजकारण होत नाही. हा युवक संविधानाचे रक्षण करत होता. संविधान संपवण्याची ही 'आरएसएस'ची विचारधारा आहे. ज्या लोकांनी हा मर्डर केला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे".
काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीत दाखल झाले असून, संविधान प्रतिकृतीची विटंबना जिथं झाली, त्या ठिकाणी भेट दिली. तसेच पोलिसांच्या ताब्यात असताना मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या अंगावर यावेळी निळ्या रंगाला टी-शर्ट होता. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी त्यांच्यासमवेत आहेत. राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांशी फरशीवर बसून संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित प वार यांची भेट घेतली. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत विकासकामांचा आढावा घेतला. बापू पठारे यांनी मतदारंसघातील विकासकामांसाठी अजित पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदाराने अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरवात झाली आहे.
भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तर सर्वांना न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस सक्षम आणि मजबूत आहेत. याशिवाय विदर्भाला चांगले खाते मिळाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून, ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल, असेही रवी राणा यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि ओबीसी नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 'तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, पाहून घेऊ', अशी प्रतिक्रिया देत अजितदादांनी विषय संपवला. दरम्यान, नाराज छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे. त्यामुळे त्यांचा दिल्ली दौरा देखील चर्चेत आला आहे.
नाराज छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. भुजबळ यांना जसे मंत्रीपद मिळालेले नाही, तसे केसरकर यांना देखील मंत्रीपद मिळालेले नाही. त्यामुळे केसरकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांची भेट देखील चर्चेत आली आहे.
मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सामाजिक, राजकीय अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महाविजयामागे ओबीसींचे मोठे पाठबळ असल्याचे कबुल केले. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिल्याचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी मला सुद्धा खूप आहे, आणि ते होऊ सुद्धा देणार नाही, असे सांगितले. 'राज्यात जे सध्या काही सुरू आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी 8 ते 10 दिवस मागितले आहे. आपण पुन्हा भेटू. चांगला मार्ग काढू. मार्ग शोधून काढू. ओबीसी नेत्यांना साधक-बाधक चर्चा करू. शांततेने घेऊ या. मार्गावर सखोल चर्चा करू', असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सागर बंगल्यावर 45 मिनिटांच्या चर्चेनंतर, नाराज छगन भुजबळ थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे. छगन भुजबळ प्रेस नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस-भुजबळ यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याची उत्सुकता आहे. नाराज भुजबळ यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांची भेट घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने, राष्ट्रवादीवर असलेली त्यांची नाराजी अधिक गडद झाल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज आहेत. आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज छगन भुजबळ नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रह होते, अशीही भूमिका भुजबळ यांनी जाहीरपणे मांडली होती. दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया दिली. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होऊ शकतात. छगन भुजबळांचा स्वभाव बंडखोरीचा आहे. त्यामुळे ते नेमका कोणता निर्णय घेतली, हे सांगू शकत नाही, असेही दरेकर यांनी म्हटले.
राहाता तालुक्यातील पुणतांबा गावातील धार्मिक स्थळी तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला. आठ दिवसापूर्वी अशीच धार्मिक स्थळातील मूर्तींची बिटंबना झाली होती. त्यात एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण आता पुन्हा एकदा धार्मिक स्थळात तोडफोड झाल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. आरोपीच्या अटकेसाठी गावकरी एकवटले असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गाव बंद ठेवत गावकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी केली. यावेळी राहाता पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी "ऑपरेशन फ्लश आऊट' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे. मागील वर्षभरात 13 टोळ्यातील 40 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले, असून 12 जणांना एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्याच बरोबर 230 जणांवर विविध गुन्ह्यांनुसार कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर येत आहेत. नांदेडहून कारने ते परभणीला दुपारी दोन वाजता रवाना होतील. संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर उसळलेल्या हिंसाचारावेळी अटक करण्यात आलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहे. तसेच राहुल गांधी आंबेडकरी चळवळीतील नेते दिवंगत विजय वाकोडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
निकालानंतर सुमारे महिन्याभरानंतर मंत्रिमंडळ खातेवाटप झाले. आता महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तिन्ही पक्षांचे अनेक नेते मंत्री झाल्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपदावर दावा केला आहे. त्यामुळे मंत्रालयातील दालनांवरून रुसवेफुगवे होऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.