NCP harad Pawar Ajit Pawar Unity : पुण्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गट एकत्र येणे, ही केवळ युती नसून विस्कळित झालेल्या एका शक्तिशाली ‘पॉवर हाउस’च्या पुनर्मांडणीची नांदी आहे. या संभाव्य मनोमिलनासाठी अजित पवार पूर्णपणे सकारात्मक असले, तरी शरद पवार यांच्या मनाचा ठाव घेणे आजही भल्याभल्यांना अशक्य आहे. ही एकजूट ‘जर-तर’वर अवलंबून असली तरी, आजवरची राजकीय तत्त्वे आणि विश्वासार्हता यांचा समतोल शरद पवार कसे राखणार, याकडेच राज्याचे लक्ष आहे.
मागील तीन-चार वर्षांतील महाराष्ट्राचे राजकारण हे नीतिमत्ता, तत्त्वे आणि विचारसरणीला मूठमाती देणारे ठरले आहे. या काळात फंदफितुरी, दगाबाजी आणि सत्तेसाठी झालेली ओढाताण अशा सर्वच बाबींचा अतिरेक पाहायला मिळाला. ज्यांनी बोटाला धरून राजकारणात आणले, त्यांनाच सत्तेच्या हव्यासापोटी धक्क्याला लावण्याचे प्रकार घडले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या बलाढ्य पक्षांमध्ये पडलेली ऐतिहासिक फूट आणि त्या फुटीवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने मिळवलेली सत्ता, हा या काळातील सर्वांत मोठा राजकीय भूकंप ठरला.
या सत्तेच्या जोरावर भाजपने राज्यात केवळ ‘मोठा भाऊ’ होण्यापर्यंतच मजल मारली नाही, तर इतर पक्षांतील दिग्गज नेत्यांना सत्तेचा बडगा किंवा विविध आमिषे दाखवून आपल्या मांडवाखाली आणण्याचा मोठा उद्योग केला. मात्र, या सत्ताकारणात ज्या निष्ठावंतांनी भाजपला जनमानसात पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्यावर बाहेरून आलेल्या ‘उपऱ्या’ नेत्यांमुळे मोठा अन्याय झाला आहे. हा सर्व इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळा डाग म्हणून कायम राहील.
राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी ‘महायुती’ सत्तेत असली, तरी भाजपची अंतर्गत वाटचाल ‘शत-प्रतिशत कमळ’ याच दिशेने सुरू आहे. दिल्लीतील सत्तेची गणिते बदलली नसती, तर आज शिंदे आणि पवार यांच्या गटाची राजकीय अवस्था काय झाली असती, याची कल्पना न केलेलीच बरी. भाजपची ही वर्चस्ववादी चाल ओळखून आता शिंदे आणि पवार हे दोन्ही नेते आपापल्या अस्तित्वासाठी कामाला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महापालिका निवडणुकांचे निमित्त साधून शरद पवार यांच्याशी काही ठिकाणी युती केली असून, भविष्यातील एकत्रीकरणाबाबतही सकारात्मक संकेत दिले आहेत. ठाकरे बंधूंमधील राजकीय संघर्षानंतर आता पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हे बदलत्या राजकारणाचे नवीन वळण ठरणार आहे.
राजकीय इतिहास नेहमीच वर्तमानकाळाला आरसा दाखवत असतो आणि राष्ट्रवादीतील ही फूट किंवा आता होऊ घातलेली दिलजमाई राजकारणासाठी नवीन नाही. १९७० च्या दशकात इंदिरा गांधींच्या काळातील काँग्रेसची फाटाफूट असो किंवा आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षातील कौटुंबिक संघर्ष, सत्तेची गरज आणि कार्यकर्त्यांचा रेटा नेहमीच विखुरलेल्या शक्तींना पुन्हा एकत्र आणण्यास कारणीभूत ठरतो. तमिळनाडूमध्ये जयललिता आणि जानकी रामचंद्रन यांच्यातील वारसाहक्काचा संघर्ष ज्याप्रमाणे शेवटी विलीनीकरणात विरघळला, तसेच काहीसे चित्र आता पवारांच्या राष्ट्रवादीबाबत दिसत आहे. त्यामुळेच, ही युती भविष्यातील पूर्ण विलीनीकरणाची पूर्वतयारी तर नाही ना, अशी रास्त चर्चा आता रंगू लागली आहे.
आजच्या घडीला देशात ‘एकपक्षीय वर्चस्वाच्या’ राजकारणाने टोक गाठले असताना, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. भाजपने राष्ट्रीय विस्ताराच्या धोरणांतर्गत अनेक राज्यांत प्रादेशिक शक्तींना कमकुवत करण्याचे डावपेच आखले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट हे त्याच धोरणात्मक खेळीचे फलित मानले जाते. ‘एक राष्ट्र, एक विचार’ या अजेंड्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचत असताना, मोठ्या नेत्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई एकट्याने लढणे कठीण वाटू लागले आहे. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रासारख्या राज्यावर पकड मजबूत ठेवण्यासाठी विखुरलेली ताकद एकत्र करणे, ही राजकीय अपरिहार्यता ठरली आहे.
पक्षात फूट पडली तेव्हा सामान्य कार्यकर्ता दिशाहीन झाला होता. ‘घड्याळ की तुतारी’ या द्वंद्वात अडकलेला कार्यकर्ता आता पुन्हा एकदा ‘दादा आणि साहेब’ एकत्र येत असल्याचे पाहून उत्साहात आहे. मात्र, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये जितका उत्साह आहे, तितकीच धाकधूक काही वरिष्ठ नेत्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड किंवा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कोणाच्या तरी पुनरागमनाने आपल्या पदावर किंवा पक्षातील स्थानावर गंडांतर येईल का, असा विचार त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
कोणतीही राजकीय युती केवळ प्रेमापोटी नसते, तर ती अस्तित्वाच्या लढाईतून जन्मते. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खऱ्या अर्थाने ‘आत्मा’ आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने मिळवलेली भावनिक मते आणि विधानसभेला अजित पवार गटाने सत्तेच्या जोरावर लावलेला विकासकामांचा धडाका, या दोन्ही जमेच्या बाजू असल्या तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या वाढता प्रभाव हा दोघांसाठीही धोक्याची घंटा आहे. हे बालेकिल्ले ढासळले असते, तर पवारांच्या राजकारणाच्या वर्चस्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. त्यामुळेच, भाजपला रोखण्यासाठी आणि आपल्या राजकारणाचे केंद्र सुरक्षित ठेवण्यासाठी दोन्ही गटांनी हातात हात घेण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला.
पवार कुटुंब हे केवळ राजकारणातच सक्रिय नाही, तर वैयक्तिक पातळीवरही एकमेकांशी किती घट्ट जोडलेले आहे, याची प्रचिती महाराष्ट्राला वारंवार येत असते. अलीकडच्या काळात जेव्हा पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाले, तेव्हा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी राजकीय भूमिकांच्या पलीकडे जाऊन त्यांना भक्कम कौटुंबिक आधार दिला. विरोधकांनी टीकेची झोड उठवली तरी त्याची पर्वा न करता ‘आम्ही सर्व एक आहोत’ हाच संदेश पवार कुटुंबाने दिला. यावरून हे स्पष्ट होते की, राजकीय मैदानात कितीही संघर्ष किंवा वैचारिक मतभेद असले, तरी या कुटुंबाची अंतर्गत वीण आजही तितकीच मजबूत आहे. अशातच अजित पवार यांनी ‘परिवार एकत्र येत आहे’ असे जाहीरपणे विधान करणे, हे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसाठी एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नव्हते. या एका विधानामुळे कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकली गेली असून, राजकीय संघर्षाच्या वातावरणात कौटुंबिक सलोख्याचा हा नवा अध्याय कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारा ठरत आहे.
भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ही ‘दुहेरी इंजिन’वर चालणारी शक्ती असेल, अशी चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. यात अजित पवार हे राज्याचे ‘किंगमेकर’ आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून आपली भूमिका बजावू शकतात. त्यांच्याकडे असलेली प्रशासनावरील पकड आणि कामाचा उरक त्यांना राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाचा नैसर्गिक प्रबळ दावेदार बनवतो. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांची दिल्लीतील अभ्यासू मांडणी आणि त्यांचा संसदपटू म्हणून असलेला अनुभव त्यांना केंद्र सरकारच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका मिळवून देऊ शकतो.
या युतीचा सर्वांत मोठा परिणाम हा महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांवर होणार आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही युती चिंतेची बाब ठरू शकते. भाजप सध्या शिंदेंचा वापर ‘मराठा चेहरा’ म्हणून करत असला, तरी जर पवारांचे दोन्ही गट एकत्र आले, तर भाजपसाठी शिंदेंपेक्षा पवारांची एकत्रित ताकद अधिक मोलाची ठरेल. अशा वेळी महायुतीत शिंदेंचे महत्त्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे, देवेंद्र फडणवीस यांचीही यात कसोटी लागेल. एकसंध राष्ट्रवादी भाजपसाठी स्पर्धक म्हणून घातक ठरू शकते, त्यामुळे भाजप या युतीला कसे हाताळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शरद पवारांनी नेहमीच भाजपविरोधी राजकारणाचा कणा म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. ‘‘भाजपसोबत कधीही जाणार नाही’’ ही त्यांची भूमिका राहिली. मात्र, अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत असताना त्यांच्याशी केलेली युती ही अप्रत्यक्षपणे भाजपच्या राजकारणाला मदत करणारी ठरेल का, अशी भीती त्यांच्या कट्टर समर्थकांना वाटत आहे. यामुळे त्यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शरद पवार यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न हा त्यांच्या ‘लिगसी’शी जोडलेला आहे. या एकत्रीकरणातून त्यांनी महाराष्ट्राची सत्ता खेचून आणली आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व वाचवले, तर लोक त्यांना पुन्हा एकदा ‘राजकीय चाणक्य’ म्हणून स्वीकारतील. मात्र, हे एकत्रीकरण केवळ सत्तेच्या तडजोडीपुरते मर्यादित राहिले, तर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासावर त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शरद पवार कोणती नवी राजकीय खेळी खेळू शकतात, हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रवाहांनी एकत्र येण्याचे पाऊल उचलले, तर ते केवळ सत्तेचे समीकरण नसेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील तो एक मोठा भूकंप ठरणार आहे. शरद पवारांची राजकीय मुत्सद्देगिरी आणि अजित पवारांची संघटनात्मक पकड पुन्हा एकाच झेंड्याखाली आली, तर 2029 च्या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते. पुण्यातून सुरू झालेला हा प्रयोग यशस्वी झाला, तर त्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटतील, यात मात्र शंका असण्याचे काही कारण नाही.
परंतु, हे एकत्रीकरण दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि मतदारांना किती रुचते, यावरच पुढचा प्रवास अवलंबून आहे. विखुरलेली शक्ती पुन्हा एकवटली, तरच हा मार्ग सत्तेच्या महामार्गाकडे जाईल; अन्यथा हे केवळ कागदावरचेच समीकरण राहण्याची भीतीही नाकारता येत नाही. त्यामुळे, महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा पवारकेंद्रीत होणार की नवी वळणे घेणार, हे येणारा काळच ठरवेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.