मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) पराभव झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकितील मतदानासाठी महाविकास आघाडीने नवी व्यूहरचना केली आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूत्रे हाती घेतल्याने त्यांनी आता त्यांच्या स्टाईलने रणनीती ठरवली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार हाॅटेल ट्रायडंडमध्ये मुक्कामासाठी आले आहेत. अजित पवार आणि जयंत पाटील हे रविवारी (ता. १९ जून) प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. आमदारांच्या समस्या ते ऐकून घेणार आहेत. त्याचवेळी या आमदाराने कोणाला मतदान करायचे, याचा आदेश ते देणार आहेत. रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे दोन राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. कोणत्या उमेदवाराला कोणी मतदान करायचे, हे अजितदादा आणि जयंत पाटील स्पष्ट करतील. तसेच काॅंग्रेसला कोणाची मते द्यायची याचाही निर्णय ऐनवेळी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आता विजयासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे आता ५४ मते झाली आहेत. सध्या तरी दोन अतिरिक्त मते राष्ट्रवादीकडे दिसत आहेत.
मतदानाचा कोटा, कोणत्या उमेदवाराला कोणत्या आमदाराने मतदान द्यायचे, वाढीव कोटा कोणाला द्यायचा, शेवटचे मतदान कोणाचे ठेवायचे, या साऱ्या चर्चांपासून आमदारांना दूर ठेवण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदारांच्या बैठकीत एकत्रितपणे या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीची रणनीती फुटली होती. त्यातून आता हा मार्ग काढण्यात आला आहे.
संबंधित आमदाराने कोणाला मतदान करायचे हे राष्ट्रवादीत फक्त तिघांनाच माहिती असणार आहे. यात तो आमदार, अजित पवार आणि जयंत पाटील यांचाच समावेश असेल. त्यामुळे राष्ट्रवादी कशा पद्धतीने मतदान करेल हे भाजपला तर कळणार नाहीच पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही कळणार आहे. याबाबत अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे धोरण निश्चित झाले.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची रणनीती फुटल्याने त्याचा फायदा भाजपने बरोबर उचलला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रथम पसंतीच्या मतांचा कोटा गरजेइतकाच मिळणार असल्याचे उघड होताच भाजपने त्याविरुद्ध डाव टाकून आपल्या दोन उमेदवारांना जादा कोटा दिला. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले. या वेळी महाविकास आघाडीची त्यातही राष्ट्रवादीची रणनीती काय असेल, हे गुपित ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसला पाठिंबा दिलेले तीनही अपक्ष आमदार आजच्या हाॅटेल ट्रायडंट येथील बैठकीला हजर असल्याने पक्षाच्या नेत्यांनी सुस्करा सोडला. संजय शिंदे, देवेंद्र भुयार आणि श्यामसुंदर शिंदे हे तीन आमदार उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या ५४ वर गेली आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याने या तिघांची मदत राष्ट्रवादीसाठी मोलाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.