NDA Government News : एकेकाळी 'मजबूत' असलेलं मोदींचं सरकार आता 'मजबूर'!

Union Budget 2024 : आंध्रप्रदेश, बिहारच्या झोळीत दान टाकता टाकता एनडीए सरकारची झोळी रिती झाली. देशात एकूण 29 राज्यं आणि 08 केंद्रशासित प्रदेश असतानाही एनडीए सरकारनं फक्त आंध्र, बिहारवर 'लक्ष्मी'ची बरसात केली.
Nitish Kumar, Chandrababu Naidu, Narendra Modi
Nitish Kumar, Chandrababu Naidu, Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

NDA News : देशात 400 हून जास्त कमळं फुलवायचीच, असा निर्धार करत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपची प्रत्यक्षात 240 कमळंच फुलली आणि स्वबळावर 272 चा जादुई आकडा गाठणं कठीण झालं. अखेर भाजपला हाती नितीश कुमारांचा 'बाण' घेत चंद्राबाबूंच्या 'सायकल'वर बसून संसद गाठावी लागली.

जेडीयू आणि तेलुगू देसम यांच्यासह अन्य काही मित्रपक्षांच्या अंगाखांद्याला धरून भाजपनं संसदेची पायरी चढली. पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) बसले पण यावेळी मात्र त्यांच्या 'मोदी जॅकेट'वर उठून दिसणाऱ्या 'कमळा'भोवती दोन 'भुंगे' येऊन घोंघावू लागले. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार!

हवं ते खाद्य मिळालं अन् भुंग्यांना हसू फुटलं!

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि गेली 10 वर्षे सत्तेत असलेल्या 'मोदी सरकार'चं 'एनडीए सरकार'(NDA) म्हणून नामकरण झालं. हे सरकार बनवण्यात आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसवण्यात जेडीयू आणि तेलुगू देसम या दोन पक्षांनी मोठा 'वाटा' उचलल्यानं बजेटमध्ये त्यांच्या 'वाट्या'ला इतरांपेक्षा जास्तीचं येणार हे आधीच कळून चुकलं होतं. अखेर बजेट सादर करण्याचा दिवस उजाडला आणि हवं ते खाद्य मिळाल्यानं भुंग्यांना हसू फुटलं!

बजेटमध्ये बिहारसाठी सुमारे 60 हजार कोटी तर आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बिहारमध्ये रस्त्यांचं जाळं विणण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांची 'बक्षिसी' तर दिलीच शिवाय नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयं आणि खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करत विशेष राज्याचा दर्जा नाही पण त्या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून विशेष पॅकेज देत नितीश कुमारांची झोळी 'फुल्ल' केली.

Nitish Kumar, Chandrababu Naidu, Narendra Modi
Nilesh Lanke Letter to PM Modi : ...अन् अहमदनगर'LCB'च्या कारभाराचा चिठ्ठा खासदार लंकेंनी थेट मोदी अन् शाह यांनाच पत्राद्वारे धाडला!

तिकडं आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूंच्या पारड्यातही भरभरून दान टाकलं. त्यांच्या स्वप्नवत अमरावती नगरीच्या विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या व्यतिरिक्त 'रिटर्न गिफ्ट' म्हणून पाणी, वीज, रेल्वे, आणि रस्ते निर्माणासाठी वेगळा निधी देण्यात येण्याची केली गेलेली तरतूद ती वेगळीच!

ज्यांच्या जिवावर केंद्रातली सत्ता मिळवली त्यांचे लाड पुरवावेच लागणार ही भाजपला पुरतं कळून चुकलंय पण ही बजेट फक्त दोन राज्यांपुरतं मर्यादित नसून ते देशातील एकूण 29 राज्यं आणि 08 केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे हे भाजपला कळत नसावं? अर्थात, कळून न कळल्यासारखं केल्याशिवाय भाजपला पुढली पाच वर्षे दुसरं काहीही करता येणार नाही, हे मात्र भाजपला एव्हाना कळून आलंय.

कारण सत्तेत राहायचं असेल तर 'कमळा'ला या दोन भुंग्यांचे लाड पुरवावेच लागतील. पण ज्यावेळी त्यांचे फाजील लाड पुरवणं भाजपला अशक्यप्राय होईल, त्यावेळी मात्र या भुंग्यांनी कमळाच्या पाकळ्या कुरतडून खायला सुरुवात करू नये म्हणजे झालं! भाजपला पडलेला यक्ष प्रश्न... 'या भुंग्यांचं करायचं काय? बोलताही येईना आणि हाकलताही येईना!'

Nitish Kumar, Chandrababu Naidu, Narendra Modi
Laxman Hake News : 'मराठा आरक्षण म्हणजे राजकीय वर्चस्वासाठी घातलेला घाट' ; लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com