NCP Activist and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरविण्याचे भाष्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारणात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, त्यांनी स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यांचा या निर्णयाला कार्यकर्त्यांनी तीव्रपणे विरोध केला. त्यानंतर पवार यांनी आपला राजीनामा माघार घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी पक्षात काही बदल करून भाकरी फिरविणार असल्याचेही स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते पवार यांचे 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे मंगळवारी (ता. २) प्रकाशन झाले. त्यावेळी पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. पवार यांच्या निर्णयाला राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि समितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ५) पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेतला.
यावेळी पवार (Sharad Pawar) म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे. यापुढे जोमाने काम करणार आहे. मी अध्यक्ष झालो तरी कुठलेही जाबादारीचे पद घेणार नाही. पक्षात आता नवे नेतृत्व, उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे. आता पक्षात नवनेतृत्व निर्माण करण्यासाठी काही संघटनात्मक बदल करणार आहे." दरम्यान, आता पवार यांनी पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जाहीर केलेल्या बदलांसाठी ते तात्काळ पावले उचलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, राज्यातील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष या संघटनात्मक पदांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पदांवरील पदाधिकाऱ्यांची नेमणूक होऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता हे पदाधिकारी बदलून पवार पक्षांतर्गत भाकरी फिरविण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे.
राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुद्धे आहेत. ते २०१५ पासून हे पदावर आहेत. सुमारे आठवर्षांपासून त्यांच्याकडे हे पद आहे. त्यामुळे या पदावर नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. महबूब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चार वर्षांपासून आहेत. पवारांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिल्यामुळे या पदाचाही ते विचार करण्याचे शक्यता आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे आहेत. ते तीन वर्षांपासून या पदावर आहेत. तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद सक्षणा सलगर यांच्याकडे आहे. या पदावर ते पाच वर्षांपासून आहेत. पक्षांतर्गत भाकरी फिरविण्याचे संकेत दिल्याने या पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, २०१८ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील (Jayant Patil) आहेत. त्यांच्या या पाच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका पार लढविल्या. त्यात पक्षाला चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाले. आता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही लवकरच नवीन चेहरा दिसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.