शरद पवारांच्या खेळीने उद्धव ठाकरेंचा डाव गुंडाळणार?

Rajya Sabha Election News : राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेवरुन राज्यात राजकारण रंगले आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sambhaji Raje
Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sambhaji Rajesarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जुंपली जाण्याची शक्यता आहे. या जागेसाठी कडव्या शिवसैनिकाच्या नावाची चाचपणी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीचे गणित सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात रविवारी गोळाबेरजेवर चर्चा होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने नवा पवित्रा घेतल्याने शिवसेनेची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. (Rajya Sabha Election News)

राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी (सहाव्या) शिवसेनेने फिल्डिंग लावल्यानंतरही पवार यांच्या या खेळीमुळे ठाकरेंवर माघारीची नामुष्की ओढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे, सत्तेत राष्ट्रवादीच्या मागे शिवसेनेची फरफट; तर होत नाही ना, असा प्रश्न शिवसेनेच्या वर्तुळात चर्चेला आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी पुढच्या महिन्यांत म्हणजे, जूनमध्ये निवडणूक होणार होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली. या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे (BJP) दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा (Congress) प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sambhaji Raje
संभाजीराजेंना अद्याप पाठिंबा नाही; अजित पवार आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार

त्यात या निवडणुकीतील सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार राहणार असल्याचे ठाकरे यांनी अधिवेशनात पक्षाच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांपुढे जाहीर केले होते. त्याबाबत महविकास आघाडीतील अन्य पक्षाच्या प्रमुखांशीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून या जागेवर एका कडव्या शिवसैनिकाला संधी देऊन निवडणूक लढण्याचा ठाकरेंचा निर्धार होता. त्यावर ठाकरे, पवार आणि अन्य नेत्यांतही सकारात्मक चर्चा होऊन, या जागेसाठी उमेदवार शोधण्याचा निरोप ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला होता. त्यामुळे शिवसेनेत उत्साह होता.

मात्र, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी केलेल्या संभाजीराजे यांना पवार यांनी पाठिंबा दिल्याच्या चर्चेमुळे थेट ठाकरेंच्या प्रयत्नांना शह दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा दिल्यास शिवसेना दुसऱ्या जागेवर लढू शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसऱ्या जागेवर पाणी सोडावे लागू शकते.

Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sambhaji Raje
सरकार पुढाकार घेत नसल्याने भास्कर जाधवांची शरद पवारांकडे धाव!

राज्यात शिवसेनेच्या मदतीने सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पक्ष मजबुतीचे प्रयत्न चालविले आहेत. या स्पर्धेत शिवसेना मागे असल्याचे चित्र आहे. त्यात शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही काँग्रेसचे नेते सोडत नसल्याने शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ आहेत. तरीही ठाकरे हे दोन्ही काँग्रेसवर मात करण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मित्रपक्षांचे धाडस वाढून, शिवसेनेला नमविण्यात येत असल्याचे सूर शिवसेना नेत्यांचा आहे. परिणामी, राज्यसभा निवडणुकीतून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील वाद पुढे येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर, यापुढच्या काळात शिवसेना मित्रपक्षांपासून सावध राहण्याचीही चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com