Maharashtr Political News : भाजपा नेत्यांकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष केले जात आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली आहे. उद्धव ठाकरे विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीलाही हजर होते. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर कडाडून हल्ला चढवतात. मात्र, असे असतानाही भाजपने उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत का? असा प्रश्न पुढे आला आहे. याच कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांचे मध्य प्रदेशातील भाषण.
मध्य प्रदेशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांवर भष्टाचाराचे आरोपही केले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही मोदींनी जोरदार टीका केली. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला नाही.
मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पाटण्यातील बैठकीला हजर असणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातून या बैठकीला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. मोदींनी लालू प्रसाद यादव, केसीआर यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांवर घोटाळे आरोप केले.
नरेंद्र मोदी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अशाप्रकारे पहिल्यांदाच टिका केली. मोदी म्हणाले ''राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचे, तर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा आणि अवैध उत्खनन घोटाळा यांची यादीही मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीटर डाऊन होत नाही, असा हल्लाबोल केला.
पुढे मोदी म्हणाले, तुम्हाला गांधी कुटुंबातील मुला-मुलींचे भले करायचा असेल, तर काँग्रेसला मत द्या. तुम्हाला मुलायमसिंह यांच्या मुलाचं भले करायचे असेल तर समाजवादी पक्षाला मत द्या. लालूंच्या कुटुंबातील मुला-मुलींचे भले करायचे असेल, तर आरजेडीला मत द्या. शरद पवारांच्या मुलींचे भले करायचे असेल, तर राष्ट्रवादीला मत द्या, तुम्हाला के.चंद्रशेखर राव यांच्या मुलींचे भले करायचे असेल, तर बीआरएसला मत द्या, अशा शब्दांत मोदींनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
मात्र, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. आदित्य ठाकरेही बैठकीला हजर होते. मात्र, मोदींनी ठाकरेंवर बोलणे टाळले. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून त्यांच्यावर भाजपाकडून (BJP) आरोप केले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचे दावे भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंपर्यंत अनेक नेत्यांनी केले.
मोदींनी ठाकरे भाषणात केला नाही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहते. सुप्रिया सुळे आणि केसीआर यांच्या मुलीचाही उल्लेख मोदींनी केला. मात्र, त्यांनी आदित्य ठाकरेंचे भले करायचे असेल, तर ठाकरेंना मत द्या असे म्हटले नाही. त्यामुळे भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवलेत का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.