Maharashtra Political News : ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा सुटणार, काँग्रेसला तगडे उमेदवार मिळणार का, साहेबांच्या राष्ट्रवादीतून कोण लढणार, यावरून महाविकास आघाडीत अजूनही खल सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित अजूनही जुळायचे नाव घेत नाही. असे असले तरी मतदारांनी मात्र आघाडीच्या पारड्यात भाजपपेक्षा अधिक मते देण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ मीडिया ग्रुप'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील सर्व 48 मतदारसंघांतील मतदारांचा कल जाणून घेतला आहे. या सर्व्हेत मतदान करताना आपले प्राधान्य कोणाला असेल, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यात दिलेल्या पर्यायात मतदारांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला 40.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे, तर इंडिया किंवा महाविकास आघाडीला तब्बल 45.7 टक्के मतदारांनी प्राधान्य दिले आहे. अपक्षास 3.7 टक्के तर यापैकी कुणालाही नाही असे 10.3 टक्के मतदार म्हणत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना नेटकी व्यूहरचना आखावी लागणार, अन्यथा भाजपला फायदा होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीची जंगी तयारी करून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा डाव आहे, तर विरोधकांना एकत्र आणून काही केल्या, मोदी सरकारला सत्तेबाहेरचा रस्ता दाखविण्याची नीती विरोधी महाविकास आघाडीची आहे. या संघर्षात महाराष्ट्रासह देशभरात फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेतली आहेत.
देशभरात अब की बार 400 पार असा नारा दिला असून, भाजपने 370 चे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी विरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा भाजपचा सपाटा सुरू आहे. राज्यातील शिंदे गट, राष्ट्रवादीला जागा सोडण्यावर अजूनही खल सुरू आहे, तर दुसरीकडे आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितबाबत निर्णय होताना दिसत नाही. जागावाटपाचे चित्र स्पष्ट नसले तरी राज्यातील लोकांचा महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी भाजपने लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कितीही चाली रचल्या तरी महाआघाडीचीच चलती राहणार असल्याचे अधोरेखित केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.