Solapur : वसंतदादा पाटील यांच्या सरकारविरोधात बंडखोरी करून ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतदादांनी नागपूर अधिवेशनावेळी दिग्गज नेत्यांसोबत माझी आमदार निवासात भेट घेतली आणि पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्यासाठी मला आग्रह केला. रोख २५ लाख रुपये आणि विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचे आमिषही दाखविले. वसंतदादांचा तो प्रस्ताव मी धुडकावला. ही माहिती मिळताच पवार यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, ती ऑफर मी नम्रमपणे नाकारली, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी सांगितले. (Sharad Pawar's ministerial offer rejects : Narsayya Adam Master)
संघटित व असंघटित कामगारांसाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचा आज ७९ वा वाढदिवस. या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी यांच्या हस्ते आज सायंकाळी सोलापुरात (Solapur) होणार आहे. तत्पूर्वी आडम मास्तर यांनी ‘सकाळ’शी बोलतानाही ही माहिती दिली.
आडम मास्तर म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) हे वसंतदादा पाटील यांच्याविरुद्ध बंडखोरी करून मुख्यमंत्री बनले होते. मात्र, नागपूर अधिवेशनावेळी दादांनी मला आमदार निवासात भेटून पवारांच्या विरोधात भूमिका घेण्याची आग्रह केला हेाता. त्यासाठी २५ लाख रुपये आणि विधान परिषदेची आमदारकी देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, वसंतदादांचा तो प्रस्ताव मी नाकारला होता.
वसंतदादा पाटील यांचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती मिळाल्यानंतर आडम मास्तर यांना शरद पवार यांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यालाही नकार दिला. त्यावेळी ‘तुमचे कोणतेही काम सांगा करेन,’ अशी हमी पवारांनी दिली होती. आपल्याला आयुष्यभर निवारा मिळाला नाही. विडी कामगारांना तरी घर मिळवून देण्याचे मृत्युशय्येवर असताना आईने आडम मास्तरांकडून वचन घेतले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सोमनाथ चटर्जी, सत्यनारायण जेठिया यांच्यामार्फत प्रयत्न करून दहा हजार घरकुलांची कॉ. गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था उभी केली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते कामगारांच्या हाती चाव्या देताना आईच्या वचनाची पूर्तता केल्याचे सात्त्विक समाधान लाभले होते.
सोलापुरातील लक्ष्मी-विष्णू मिल पिठाच्या गिरणीप्रमाणे सुरू होती. नरसिंग गिरजी मिल सरकारच्या धोरणामुळे; यशवंत, सोलापूर गिरणी नेत्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे, वेस्ट कॉटन मिल कर्जामुळे दिवाळखोरीत निघाली हेाती, त्यामुळे सोलापूरच्या कामगारांची स्थिती बिकट झाली होती. कामगारांच्या वेतनासाठी लढत असतो. युती सरकारच्या काळात टेक्स्टाईल उद्योगावर अन्यायकारक असा चार टक्के विक्री कर लादण्यात आला होता. तो आदेश पाठपुरावा करून मागे घेण्यास लावला. धुम्रपान विरोधी कायद्यावेळी घाबरलेल्या विडी कारखानदारांना दिलासा देण्याचे काम केले. तब्बल २८ दिवस तीन वर्षांपूर्वी विडी उद्योग बंद होता. या काळात पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात लोकसभेत आवाज उठवून या उद्योगास संरक्षण देण्याचे कामही केले, असेही मास्तरांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.